लग्न कधी करणार? श्रद्धा कपूरने तिच्याच अंदाजात दिलं मजेशीर उत्तर, पिकला हशा
अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयीच्या प्रश्नाचं मजेशीर उत्तर दिलं आहे. 'स्त्री 2' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाला लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेलं उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यानिमित्त चित्रपटाच्या टीमकडून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एका पत्रकाराने श्रद्धाला तिच्या लग्नाविषयीचा प्रश्न विचारला. त्यावर श्रद्धाने तिच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचं नाव पटकथालेखक राहुल मोदीशी जोडलं जातंय. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये राहुलसोबतचा फोटो पोस्ट करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.
“श्रद्धा कपूर नवरी कधी होणार”, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर चित्रपटाच्या डायलॉगचा वापर करत तिने मजेशीर उत्तर दिलं. ती म्हणाली, “वो स्त्री है, उसे जब दुल्हन बनना है वो बनेगी” (ती स्त्री आहे, तिला जेव्हा नवरी बनायचं असेल तेव्हा ती बनेल.) श्रद्धाचं हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
View this post on Instagram
कोण आहे राहुल मोदी?
राहुल मोदी हा पटकथालेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची श्रद्धा कपूरशी भेट झाली. राहुलने याआधी ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलंय. राहुल हा श्रद्धापेक्षा वयाने लहान असल्याचं कळतंय. त्याचं वय 34 वर्षे असून श्रद्धा कपूर ही 37 वर्षांची आहे. राहुलचं दिग्दर्शक सुभाष घई यांच्याशीही कनेक्शन आहे. कारण त्याने घई यांच्याच ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट’मधून पदवी प्राप्त केली.
राहुल आणि श्रद्धा कपूरने अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी जामनगरमध्ये आयोजित केलेल्या प्री-वेडिंग कार्यक्रमामध्ये श्रद्धा राहुलसोबत पोहोचली होती. श्रद्धाने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये राहुल मोदीसोबतचा सेल्फी पोस्ट केला होता. त्यावर तिने लिहिलं होतं, ‘दिल रख ले, नींद तो वापस दे दे यार’ (माझं हृदय तुझ्याकडे ठेव, पण झोप तरी परत दे). या कॅप्शनच्या पुढे तिने स्माइली आणि हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता.
