मालिकेतही योजनांचा बोलबाला; ‘लाडक्या बहिणी’नंतर आता ‘लाडकी लेक’ आली चर्चेत
या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज मुख्य भूमिका साकारतेय. 'शुभ श्रावणी' ही मालिका दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना नाट्यमय ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘शुभ श्रावणी’ या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेतील राज्याचे शिक्षणमंत्री विश्वंभर राजशिर्के यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली होती. त्यातलीच एक ‘लाडकी लेक योजना’ आता लाँच होणार असून, या योजनेचं उद्घाटन खुद्द शिक्षणमंत्री विश्वंभर राजशिर्के आणि त्यांची मुलगी श्रावणी यांच्या हस्ते होणार आहे. यातून वडील आणि मुलीचं नातं अधिक दृढ करणं आणि मुलींना अधिक चांगलं शिक्षण देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र श्रावणीला मिळणारं हे महत्त्व अलकनंदाला सहन होत नाही. श्रावणीला या सोहळ्यापासून दूर ठेवण्यासाठी अलकनंदा एक भयानक खेळ खेळते. ती जाणीवपूर्वक असा कट रचते ज्यामध्ये श्रावणीचा अपघात होतो. श्रावणी जखमी झाल्याने राजशिर्के कुटुंबात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
श्रावणीच्या दुखापतीमुळे विश्वंभर राजशिर्के अत्यंत संतापात आहेत. हाताला दुखापत झालेली असताना श्रावणीला उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणं शक्य नाही आणि यामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो आणि या रागाच्या भरात ते श्रावणीलाच याचा दोष देऊ लागतात. श्रावणीच्या अडचणीत भर पडलेली असतानाच, नेहमीप्रमाणे शुभंकर तिच्या मदतीला धावून येणार आहे. शुभंकर अत्यंत हुशारीने उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधत विश्वंभर राजशिर्केंची समजूत घालण्यास विनंती करतो. तो पटवून देतो की श्रावणीच्या हाताला दुखापत असली तरी ती कार्यक्रमात सहभागी होऊ शकते आणि तिच्यावर कोणताही ताण येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. आता शुभंकरचा हा प्रयत्न यशस्वी होऊन विश्वंभर राजेशिर्के यांचं मन वळवण्यात तो यशस्वी होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
View this post on Instagram
एकीकडे शुभंकरचे प्रयत्न आणि दुसरीकडे श्रावणीला रोखण्यासाठी अलकनंदाची नवी खेळी, अशा दुहेरी पेचात श्रावणी अडकली आहे. श्रावणी या संकटावर मात करून ‘लाडकी लेक’ योजनेचा शुभारंभ करणार का? वडील आणि मुलीच्या नात्याचा हा गोडवा प्रेक्षकांना अनुभवता येणार का? हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे.
