Shweta Tiwari : आधी संताप, आता म्हणाली थँक्यू… श्वेता तिवारीने राज ठाकरेंचे मानले आभार; काय घडलं नेमकं?

अभिनेत्री श्वेता तिवारीने महिलांवरील ऑनलाइन ट्रोलिंगविरोधात आवाज उठवला होता, ज्यात मनसे समर्थक असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश होता. तिने राज ठाकरेंना प्रश्न विचारला होता. आता श्वेताने यावर स्पष्टीकरण दिलं आहे, तसेच मनसे नेत्या स्नेहल अडारकर यांनी या प्रकरणी तत्पर कारवाई केल्याने श्वेताने राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.

Shweta Tiwari : आधी संताप, आता म्हणाली थँक्यू... श्वेता तिवारीने राज ठाकरेंचे मानले आभार; काय घडलं नेमकं?
श्वेता तिवारी राज ठाकरेंना म्हणाली थँक्यू
| Updated on: Aug 27, 2026 | 5:54 PM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) काही दिवसांपूर्वी बरीच चर्चेत आली होती. सोशल मीडियावर महिलांविरोधात अश्लील आणि अपमानास्पद कमेंट्स करणाऱ्या ट्रोलर्सविरोधात तिने आवाज उठवला होता. एवढंच नव्हे तर तिने यासंबंधित ट्रोलर्सच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते. यापैकी एका व्यक्तीने स्वतःला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) समर्थक असल्याचा दावा केला होता. त्यामुळे श्वेता हिने याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सवालही विचारला होता. मात्र, आता तिने मोठा यू-टर्न घेतला असून तिने या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देत संबंधित ट्रोलर मनसेचा सदस्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

श्वेता तिवारीने केली पोस्ट

तिच्या सोशल मीडिया अकाऊंवर श्वेताने काही स्टोरीज पोस्ट करत याबद्दल स्पष्टीकरण दिलं. ” काही दिवसांपूर्वी मी एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यामध्ये काही लोक कोणत्याही कारणाशिवाय महिलांविरोधात अश्लील आणि अपमानास्पद कमेंट्स कशा करत आहेत, हे दाखवलं होतं. मी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते. कारण अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या लोकांना आपण सहज सुटू शकतो, असं वाटता कामा नये, असं माझं मत होतं. मी राज ठाकरे यांनाही याबाबत प्रश्न विचारला होता,” असं तिने लिहीलं

पुढे श्वेताने लिहीलं, ” माझ्या या पोस्टनंतर मनसे नेत्या स्नेहल अडारकर यांनी माझ्याशी संपर्क साधला. महिलांविरोधातील अशा प्रकारचे अपमानास्पद वर्तन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणातील व्यक्ती मनसेची सदस्य नसल्याचेही त्यांनी सांगितलं” असं श्वेताने नमूद केलं. स्नेहल अडारकर यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, अवघ्या तीन दिवसांत त्यांनी मला व्यक्तीचा फोन नंबर आणि त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला माफीनामा पाठवले, असं श्वेताने पुढे आपल्या स्टोरीत सांगितलं.

श्वेताने केलं कौतुक

या कारवाईचे श्वेताने कौतुक केलं. महिलांच्या अपमानाच्या मुद्द्याला गांभीर्याने घेतले जात असल्याचे पाहून मला समाधान वाटलं, असं ती म्हणाली. भविष्यात अशा प्रकारची अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आश्वासनही स्नेहल अडारकर यांनी आपल्याला दिलं, असंही तिने नमूद केलं,

राज ठाकरे यांचे मानले आभार

श्वेता हिने संबंधित व्यक्तीच्या माफीनाम्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. ऑनलाइन ट्रोलिंग आणि महिलांविरोधातील गैरवर्तन ही केवळ एका व्यक्तीपुरती किंवा एका घटनेपुरती मर्यादित समस्या नसल्याचं तिने म्हटलं. ही समस्या केवळ एका व्यक्तीपुरती किंवा एका घटनेपुरती मर्यादित नाही. एक-दोन लोकांना पकडल्याने ही समस्या संपणार नाही. मला आशा आहे की जगातील तंत्रज्ञान कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यावर काहीतरी ठोस उपाय शोधतील. कारण ऑनलाइन होणारा छळ आता नियंत्रणाबाहेर जात आहे. तरीही, आज मी या प्रकरणात करण्यात आलेल्या प्रयत्नांचे कौतुक करू इच्छिते. हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याबद्दल धन्यवाद, राज ठाकरे जी” असं म्हणत तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले.

श्वेताचं वर्कफ्रंट

श्वेता तिवारीच्या कामाबद्दल सागांयचं झालं तर तिने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ शोमधून खूप प्रसिद्धि मिळाली. त्यात ती प्रेरणा शर्माच्या भूमिके दिसली. तिचे चाहते तिला आजही याच नावाने ओळखतात. त्यानंतर श्वेता तिवारी हिने ‘अपने वाला पल’, ‘कलीरें’, ‘करम’, ‘कहीं किसी रोज’, ‘क्या हादसा क्या हकीकत’, ‘दोस्त’, ‘नच बलिए 2’. ‘झूम इंडिया’, ‘नागिन’, ‘झलक दिखलाजा 3’, ‘बिग बॉस 4’, ‘मेरे डॅड की दुल्हन’, ‘मैं हूं अपराजिता’, असे अनेक शोज केले.

Follow Us