
सोनू निगम हा बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. संगीत श्रेत्रातील अमूल्य योगदानामुळे सोनू निगमला पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. सोनू निगमचं करिअर आणि त्याची गाणी अनेकांना माहित असली तरी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना फारसं माहीत नाही. वैयक्तिक आयुष्याबद्दल सोनू निगम फारसं व्यक्तही होत नाही. त्याची पत्नी मधुरिमासुद्धा प्रकाशझोतापासून लांबच राहणं पसंत करते. सोनू निगम आणि मधुरिमा यांची पहिली भेट एका कार्यक्रमात झाली होती. दोघांच्या वयात पाच वर्षांचं अंतर असूनही ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर या दोघांनी 15 फेब्रुवारी 2002 रोजी लग्न केलं. मात्र लग्नाच्या पाच वर्षांच्या आतच सोनू निगम आणि मधुरिमाच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या.
मधुरिमाने 2007 मध्ये मुलाला जन्म दिला. त्यापूर्वीच 2005 मध्ये सोनू आणि मधुरिमा यांच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांविषयीच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. गायिका सुनिधी चौहान आणि स्मिता ठाकरे यांच्यासोबतच्या मैत्रीमुळे सोनू निगमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्याचे वृत्त त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. एका जुन्या मुलाखतीत खुद्द सोनू त्याच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. संसारात एक अशी वेळ आली होती, जेव्हा मी खरंच घटस्फोटाचा विचार करत होतो, अशी कबुली सोनू निगमने दिली होती.
“जर माझा मुलगा नसता तर मी अत्यंत आदरपूर्वक आणि कोणत्याही नकारात्मकतेशिवाय माझ्या पत्नीला सांगितलं असतं की, हे नातं मी अजून टिकवू शकत नाही. पण आमच्या मुलाला त्याचे दोन्ही पालक सोबत हवे होते. माझी पत्नी खूप चांगली आहे, पण कधीकधी संसारात समस्या येतात आणि लोक विभक्त होतात. मी सहा महिने काम केलं असतं आणि सहा महिने आईच्या गावी हिमालयात गेलो असतो”, असं तो म्हणाला होता.
2021 मध्ये ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीतही सोनू निगमने पत्नी मधुरिमासोबतच्या गेल्या 12 वर्षांच्या संसारात अनेक अडचणी आल्याचं म्हटलं होतं. मात्र या अडचणींवर मात करून दोघांनीही मुलगा नेवान निगमचं संगोपन एकत्र करायचं ठरवलंय. एप्रिल 2021 मध्ये हो दोघं ‘द कपिल शर्मा शो’मध्ये एकत्र आले होते.