‘माझा अन् माझ्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात..’, सोनू निगम भडकला; नेमकं काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या नावाचा गैरवापर होत असल्याची तक्रार केली आहे. सोनू निगम सिंह नावाच्या व्यक्तीवर त्याने हा आरोप केला आहे. त्यावर संबंधित व्यक्तीनेही आपली बाजू मांडली आहे. जन्मापासूनच माझं नाव सोनू निगम असल्याचं त्याने म्हटलंय.

प्रसिद्ध गायक सोनू निगम एका एक्स (ट्विटर) अकाऊंटमुळे प्रचंड संतापला आहे. खरंतर सोनू निगमचं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणताच अधिकृत अकाऊंट नाही. मात्र ‘सोनू निगम सिंह’ या नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटमुळे नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. सोनू निगम सिंह हा बिहारचा वकील आहे. नुकतंच त्याने त्याच्या एक्स अकाऊंटवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत गायक सोनू निगमचा फोटो पोस्ट केला होता. याच पोस्टचा स्क्रीनशॉट सोनू निगमने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘हे दिशाभूल करणारं नाही का? हे माझंच अकाऊंट आहे असं लोकांना का वाटू शकणार नाही’, असा सवाल करत सोनू निगमने त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर संबंधित वकिलाकडून जर एखादी वादग्रस्त पोस्ट लिहिली गेली तर त्याचा सोनू निगम आणि त्याच्या कुटुंबीयांवर किती वाईट परिणाम होऊ शकतो, याचीही जाणीव त्याने करून दिली.
सोनू निगमची पोस्ट-
‘माझं ट्विटर किंवा एक्सवर अकाऊंट नाही. या सोनू निगम सिंहच्या अकाऊंटवरून एक जरी वादग्रस्त पोस्ट लिहिली गेली तर त्यामुळे माझ्या किंवा माझ्या कुटुंबीयांच्या जिवाला किती धोका असू शकतो, याची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. हा माणूस माझ्या नावाशी आणि विश्वासार्हतेशी किती खेळतोय, याची तुम्ही कल्पना करू शकता का? तेही आमची कोणतीही चूक नसताना आणि मीडिया, प्रशासन, सरकार, कायदा ज्यांना याबद्दल माहिती आहे, ते सर्व शांत आहेत. काहीतरी मोठं घडण्याची वाट पाहत असतील आणि ते घडल्यानंतर शोक व्यक्त करायला येतील. धन्यवाद’, अशा शब्दांत सोनूने तीव्र संताप व्यक्त केला आहे.




View this post on Instagram
सोनू निगम सिंहने मांडली आपली बाजू
‘2009 पासून हे माझं ट्विटर हँडल आहे. मी हेसुद्धा स्पष्ट केलंय की मी बिहारचा एक वकील आहे. जन्मापासूनच माझं नाव सोनू निगम आहे (तुम्हाला माझा पासपोर्ट पहायचा आहे का?)’ कालची माझी पोस्ट (जी तुमच्या गोंधळामुळे आधीच काढून टाकण्यात आली आहे) ही अध्यक्ष महोदया, श्रीमती द्रौपदी मुर्मूजी आणि त्यांनी सांस्कृतिक प्रतिभेला दिलेल्या प्रोत्साहनासाठी होती. या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मी ही पोस्ट करतोय, तेसुद्धा माझंच अकाऊंट आहे आणि मी कधीच गायक सोनू निगम असल्याचा दावा केला नाही. जर कोणी मला गायक सोनू निगम समजत असेल तर मी नेहमीच त्यांचा गैरसमज दूर केला आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवरही मी अनेकदा हे स्पष्ट केलंय. गरज पडल्यास मी पुन्हा एकदा ट्विट करून स्पष्ट करू शकतो की आम्ही दोन वेगवेगळे व्यक्ती आहोत. तुम्हीसुद्धा ते तुमच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू शकता,’ असं त्याने म्हटलंय.
यावर नेटकऱ्यांकडूनही विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. ‘दुसऱ्यांचंही नाव सोनू निगम असू शकत नाही का सर’, असा सवाल एका युजरने केला आहे. तर ‘लॉकडाऊनपासून तो तुमच्या नावाचा वापर करत वादग्रस्त पोस्ट करतोय आणि लोकांना ती व्यक्ती तुम्हीच असल्याचं वाटतंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मी हे ट्विटर हँडल तुमचंच आहे असं समजून फॉलो केलं होतं’, अशी कबुली नेटकऱ्यांनी दिली.