
महिलांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अशा अनुभवांना सामोरं जावं लागतं, ज्याबद्दल त्या फारशा कधी व्यक्त होत नाहीत. अभिनेत्री सोहा अली खानसोबत अशीच एक भयानक घटना घडली. एका व्यक्ती भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी सोहासमोर अश्लील चाळे करत होता. लोकल ट्रान्सपोर्टने प्रवास करणाऱ्यांना दररोज अशा गोष्टींना कशा पद्धतीने तोंड द्यावं लागतं, याविषयी सोहा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. महिलांसोबत सर्रास अशा घटना घडतात, परंतु त्याविषयी काहीच केलं जात नाही, अशी खंत तिने व्यक्त केली.
‘हॉटरफ्लाय’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सोहाला विचारण्यात आलं की, सार्वजनिक ठिकाणी कधी तुला वाईट अनुभव आला का? त्यावर तिने उत्तर दिलं, “होय, इटलीमध्ये माझ्यासोबत असं घडलं होतं. खरंतर अशा घटना अनेकदा घडतात. परंतु दिवसाढवळ्या? त्यांचा हेतू काय असतो, मला समजत नाही. त्यांच्या मनात काय चाललंय ते मला माहीत नाही. परंतु अशा गोष्टी करणाऱ्यांच्या मनात काय आहे, ते अशा गोष्टी का करतात हे मी समजून घेऊ इच्छित नाही.”
यावेळी सोहाने इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचचाही उल्लेख केला. “माझ्याबाबतीत असलेली खास गोष्ट म्हणजे माझी कौटुंबिक पार्शभूमी ही बॉलिवूडशी संबंधित आहे. त्यामुळे कदाचित मी कुठेतरी या सर्व गोष्टींपासून वाचले, असं मला वाटतं. भाऊ सैफ अली खान आहे, आई शर्मिला टागोर आहे.. त्यामुळे कदाचित माझ्यासोबत कोणी तशी हिंमत केली नाही. मला खरंच असा कोणताही अनुभव आला नाही. यासाठी मी देवाचे आभार मानते”, असं तिने सांगितलं.
सोहाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच ‘छोरी- 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये तिच्यासोबत गश्मीर महाजनी आणि जितेंद्र कुमार यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विशाल फुरिया दिग्दर्शित हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छोरी’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. हा चित्रपटसुद्धा ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक होता.