Sonu Sood: सोनू सूद पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन थेट काठमांडूत पोहोचला, म्हणाला ‘उद्ध्वस्त झालेली आयुष्य पुन्हा उभी करणार’
Sonu Sood: कोरोना महामारीच्या काळात परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी केलेल्या मदतीमुळे सोनू सूदला ‘रिअल हिरो’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यानंतरही विविध नैसर्गिक आपत्ती आणि गरजूंसाठी त्याने मदतीचा हात पुढे केला आहे. आता नेपाळच्या संकटात तो स्वतः मैदानात उतरल्याने त्याच्या सामाजिक कार्याचं पुन्हा एकदा कौतुक होत आहे.

Sonu Sood: अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा त्याच्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत आला आहे. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे हजारो नागरिक संकटात सापडले असताना सोनू सूद मदतीचा हात घेऊन थेट काठमांडूत पोहोचला आहे. त्याच्या ‘सूद चॅरिटी फाऊंडेशन’कडून पूरग्रस्तांसाठी आवश्यक वस्तू आणि अन्नसामग्री पाठवण्यात आली आहे. आता सोनू स्वतः काठमांडूत जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे. सोनू सूद आणि त्याच्या टीमने भारतातून नेपाळमध्ये अन्नपदार्थ, ब्लँकेट आणि इतर आवश्यक साहित्य नेलं आहे. पुरामुळे घरं आणि दैनंदिन जीवन उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना तातडीची मदत मिळावी, हा या मोहिमेचा उद्देश आहे. परिस्थिती पाहून पुढे आणखी कोणत्या वस्तूंची गरज आहे, याचा आढावाही त्याची टीम घेत आहे.
यावेळी सोनू म्हणाला, “गरजू लोकांसोबत उभं राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सध्या मदत म्हणून अन्न आणि ब्लँकेट पोहोचवले जात असून, स्थानिक नागरिकांना आणखी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, याची माहिती घेतली जात आहे. गरजेनुसार भारतातून पुढील मदत पाठवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.” सोनू सूदने केवळ तात्पुरती मदत करण्याऐवजी पूरग्रस्तांचं आयुष्य पुन्हा सुरळीत करण्यासाठी पुढील काही महिन्यांतही मदत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नेपाळमधील परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर आहे. अलीकडील भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असून, हजारो लोक बेपत्ता आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झाल्याने अनेक भागांमध्ये मदत पोहोचवणंही आव्हानात्मक ठरत आहे.
View this post on Instagram
नेपाळ दौऱ्यादरम्यान सोनू सूदने पुरामुळे सर्वाधिक उद्ध्वस्त झालेल्या भागांपैकी एका गावाला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्याने स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. भारताकडून नेपाळला मिळणाऱ्या मदतीचंही त्याने कौतुक केलं. आपत्तीच्या काळात शेजारी देशाच्या मदतीला भारत उभा राहिला असल्याचं सोनूने अधोरेखित केलं.
“मला आशा आहे की आपण सर्वजण नेपाळच्या लोकांसाठी मदत पोहोचवू शकू, जेणेकरून नेपाळ पुन्हा आपल्या पायावर उभं राहू शकेल. मला असंही वाटतं की भारत सरकारने अभूतपूर्व काम केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार.. नेपाळला ज्या प्रकारची मदत पुरवण्यात आली आहे, ती कौतुकास्पद आहे. आपण ही मदत पाठवत राहिलं पाहिजे, कारण त्यांना गरज आहे. इथे प्रत्यक्ष जेव्हा मी त्या कुटुंबाना भेटलो, तेव्हा मला कळलं की हा प्रश्न काही आठवड्यांत किंवा महिन्यांत सुटणार नाही”, असं तो म्हणाला.
नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील पुरामुळे मृतांचा आकडा 1127 वर पोहोचला आहे. तर साडपलेल्या मृतदेहांपैकी आतापर्यंत फक्त 95 मृतदेह ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
