
भारत सरकारने नुकतंच 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली होती. यामध्ये पहिल्यांदाच अभिनेता शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘जवान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आता एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. ‘उल्लोझुक्कू’ या दाक्षिणात्य चित्रपटात लीलाम्माची भूमिका साकारणारी अभिनेत्री उर्वशीने ‘किंग’ खानला जाहीर झालेल्या पुरस्कारावर सवाल उपस्थित केला आहे. राष्ट्रीय पुरस्कारासाठी कोणते निकष लावले जातात, असा प्रश्न तिने केला आहे. विशेष म्हणजे खुद्द उर्वशीलाही सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘मनोरमा न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत उर्वशी म्हणाली, “अभिनयाचा कोणता स्टँडर्ड स्केल (मानक प्रमाण) असतो का? की असं आहे का, विशिष्ट वयानंतर तुम्हाला हेच मिळणार? हा पेन्शनचा पैसा नाही, ज्याला गुपचूप घेतलं जाईल. हा निर्णय कसा घेतला जातो? त्यासाठी कोणते निकष पाळले जातात?” हे सर्व प्रश्न उपस्थित करतानाच उर्वशीने राज्यमंत्री सुरेश गोपी यांना मल्याळम चित्रपटांकडे का दुर्लक्ष केलं गेलं, याची चौकशी करण्याची विनंती केली आहे.
‘एशियानेट न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने विचारलं, “शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडण्यामागचे निकष काय होते? आणि विजय राघवन यांना फक्त सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्काराला का समाधान मानावं लागतंय? ते दिग्गज कलाकार असूनही त्यांना विशेष ज्युरी मेंशनसाठी का निवडलं गेलं नाही?” यावेळी उर्वशीने थेट राजकारणाचा आरोप केला. 2006 मध्ये जेव्हा तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तेव्हाही राजकारण होतं, असं ती म्हणाली.
यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार दोन अभिनेत्यांमध्ये विभागून देण्यात आला आहे. ‘जवान’साठी शाहरुखला आणि ‘बारवी फेल’साठी विक्रांत मेस्सीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अभिनेत्री राणी मुखर्जीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. मॉलिवूडमधून ‘उल्लोझुक्कू’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या शर्यतीत उर्वशीचंही नाव होतं, अशी चर्चा आहे. त्यामुळेच कदाचित तिने हे सवाल उपस्थित केल्याचं म्हटलं जात आहे.