मी थेट कचऱ्याच्या डब्यात..; नॅशनल अवॉर्ड्सबद्दल सुपरस्टारचं वादग्रस्त वक्तव्य

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने राष्ट्रीय पुरस्कारांवर केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. मला जर हा पुरस्कार मिळाला, तर तो मी कचऱ्याच्या डब्यात फेकून देईन, असं त्याने म्हटलंय. याआधी या अभिनेत्याने सेन्सॉर बोर्डावरही निशाणा साधला होता.

मी थेट कचऱ्याच्या डब्यात..; नॅशनल अवॉर्ड्सबद्दल सुपरस्टारचं वादग्रस्त वक्तव्य
साऊथ सुपरस्टार
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 21, 2025 | 10:08 AM

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण झालं. यंदा बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान, विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाहरुखला त्याच्या करिअरमधील पहिलाच नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. परंतु अनेकदा या पुरस्कारांवरून मतमतांतरे पहायला मिळतात. राष्ट्रीय पुरस्कार असो किंवा इतर कोणताही, त्याच्या मापदंडांवरून विविध प्रश्न उपस्थित केले जातात. आता एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने या पुरस्कारांवर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्याने नाराजीसुद्धा बोलून दाखवली.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साऊथ सुपरस्टार विशाल म्हणाला, “मला पुरस्कारांवर विश्वास नाही. मला हा सर्व प्रकार एक मूर्खपणाच वाटतो. कशा पद्धतीने फक्त चार लोक एका जागी बसून कोट्यवधी लोकांसाठी बनलेल्या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री आणि सहाय्यक कलाकारांचे पुरस्कार निश्चित करतात? मग फक्त ही चार लोकंच सगळ्यांचे बॉस आहेत का? मी हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबद्दलही बोलतोय. तुम्ही सर्वेक्षण करायला हवं आणि लोकांचं मत जाणून घ्यायला हवं. हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. अशा पुरस्कारांवर मी कसा विश्वास करू, जिथे फक्त 4-8 लोक बसून विजेता ठरवतात. अशा पुरस्कारांवर मला अजिबात विश्वास नाही. हे पूर्णपणे मूर्खपणाचं आहे.”

याविषयी तो पुढे म्हणाला, “माझे हे विचार माझ्या कोणत्या वैयक्तिक अनुभवावरून किंवा कोणाशी प्रभावित होऊन तयार झाले नाहीत. परंतु पुरस्कारांचं संपूर्ण इकोसिस्टिमच दूषित आहे. याच निष्पक्षपणाची कमतरता आहे. मी जर आयोजकांना सांगून ठेवलंय की जर मला हा पुरस्कार मिळाला तर तो मी थेट कचऱ्याच्या डब्यात टाकून देईन. जर तो पुरस्कार सोन्याचा बनलेला असेल तर मी त्याला विकून त्यातून मिळणारे पैसे दान करेन. मी आधीच सांगून ठेवलंय की मला पुरस्कार देऊ नका. उलट जो खरंच त्या लायक असेल, त्याला तो पुरस्कार द्या. खरी पोचपावती ही प्रेक्षकांकडून मिळते, परीक्षकांकडून नाही.”

विशाल त्याची मतं बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखला जातो. याआधी त्याने सेन्सॉर बोर्डावरही निशाणा साधला होता. मार्क अँटनी या चित्रपटाला सर्टिफिकेट देण्याच्या बदल्यात साडेसहा लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप विशालने सेन्सॉर बोर्डावर केला होता. या आरोपांतर चित्रपटसृष्टीत चांगलीच खळबळ उडाली होती.