
Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने काही दिवसांपूर्वीच भाषेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आपली स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. कोणालाही जबरदस्तीने एखादी भाषा बोलायला लावू नये असे मत त्याने व्यक्त केले होते. मराठी भाषेबाबत बोलताना त्याने सांगितले की, मराठी बोलणे हे त्यांच्या इच्छेने असावे, दबावाखाली नसावे.
ANI च्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, जर कुणी त्याला ‘मराठी बोलणं अनिवार्य आहे’ असे सांगितले तर ते स्पष्टपणे म्हणेल की ते आवश्यक नाही. ‘मी मराठी बोलेन पण ते माझ्या मनाने. मला जबरदस्ती करू नका, असे त्याने ठाम शब्दांत सांगितले.
घर सोडणं म्हणजे ओळख सोडणं नाही
सुनील शेट्टीने आपल्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले की, लहान वयात घराबाहेर पडण्याचा अर्थ स्वतःची ओळख सोडणे असा होत नाही. कर्नाटकातील मंगलुरु येथून बाहेर पडताना आपण कोणासारखे बनण्यासाठी किंवा कुणाची नक्कल करण्यासाठी गेलो नव्हतो असे त्याने स्पष्ट केले.
‘मी खूप लहान वयात कर्नाटकातून बाहेर पडलो पण कोणीतरी दुसरं व्हायचं म्हणून नाही’ असे तो म्हणाला. बाहेर जाण्याचा उद्देश फक्त चांगल्या संधी शोधणे हाच होता असेही त्याने सांगितले.
मराठी भाषेबाबत नेमकं काय म्हणाले?
मुंबईत करिअर उभारल्यानंतरही आपली ओळख बदललेली नाही असे सुनील शेट्टीने सांगितले. त्याने स्पष्ट केले की आजही त्याच्या कामात, विचारांमध्ये आणि मूल्यांमध्ये मंगलुरु स्पष्टपणे दिसून येते. ‘मी जे काही करतो, त्यामध्ये मंगलुरु आहे’ असे सांगत त्याने आपल्या मूळ शहराशी असलेली घट्ट नाळ अधोरेखित केली.
मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना सुनील शेट्टी म्हणाले की, जेव्हा त्याला विचारले जाते की ‘मराठीचं काय?’ तेव्हा त्यावर तो उलट प्रश्न करतो ‘मराठीचं काय?’ तो पुढे म्हणतो, ‘जर कोणी माझ्यावर मराठी बोलण्याची सक्ती केली,तर मी सांगतो की ते गरजेचे नाही. मी जेव्हा वाटेल तेव्हा बोलेन. कृपया मला जबरदस्ती करू नका.’
आपली भूमिका स्पष्ट करतानाच सुनील शेट्टीने हेही ठामपणे सांगितले की, त्याच्या बोलण्यातून कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. मुंबईला त्याने आपली कर्मभूमी मानले असून मराठी भाषा शिकणे ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.