
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देओल परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांचं एक नव्हे तर दोन कुटुंब आहेत. जरी या दोन्ही कुटुंबांना एकत्र पाहिलं गेलं नसलं तरी त्यांच्यातलं नातं अजूनही कायम आहे. प्रकाश कौर यांच्याशी विवाहित असताना धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत. ईशा आणि अहानाचे भाऊ सनी आणि बॉबी देओल यांच्याशी संबंध चांगले असले तरी सावत्र बहिणींच्या लग्नाला दोघंही भावंडं उपस्थित नव्हते.
ईशा देओलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती सनी देओलला तिच्या वडिलांसारखं मानते आणि त्यांचा खूप आदर करते. बॉबीसोबतचंही नातं चांगलं आहे, परंतु तो फार लोकांमध्ये मिसळत नसल्याचं तिने म्हटलं होतं. सनी आणि बॉबी देओल हे त्यांच्या दोन्ही सावत्र बहिणींवर कायम प्रेमाचा वर्षाव करतात. इतकंच नव्हे तर जेव्हा कधी ते परदेशात जायचे, तेव्हा बहिणींसाठी अनेक भेटवस्तू घेऊन यायचे, असंही म्हटलं जातं.
ईशा देओलने 2012 मध्ये भरत तख्तानीशी लग्न केलं होतं. सनी आणि बॉबी देओलला या लग्नाला जायचं होतं, परंतु त्यांनी त्यापासून स्वत:ला दूरच ठेवलं. सनी आणि बॉबीने ईशा देओलच्या लग्नाशी जाणूनबुजून दुरावा ठेवला असं म्हटलं जातं. कारण त्यांना त्यांच्या आईला कोणताच त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळे सनी आणि बॉबीच्या अनुपस्थितीत अभय देओलने भावाच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या होत्या. हेमा मालिनी यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, सनी आणि बॉबी देओल त्यांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते, म्हणून ते ईशाच्या लग्नाला येऊ शकले नव्हते. परंतु अहानाच्या लग्नात ते आवर्जून येतील, असं त्या म्हणाल्या होत्या. परंतु अहानाच्या लग्नालाही सनी किंवा बॉबी उपस्थित नव्हते.
धर्मेंद्र यांनी दोन लग्न केले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर आणि दुसऱ्या पत्नीचं नाव हेमा मालिनी आहे. दोन्ही पत्नींकडून धर्मेंद्र यांना सहा मुलं आहेत. पहिल्या पत्नीपासून धर्मेंद्र यांना चार मुलं आहेत. सनी देओल, बॉबी देओल, अजीता देओल आणि विजेता देओल अशी त्यांची नावं आहेत. तर दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्याकडून त्यांना दोन मुली आहेत. ईशा देओल आणि अहाना देओल अशी त्यांची नावं आहेत.