जराही लाज नाही का? धर्मेंद्र यांच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे पापाराझींवर भडकला सनी देओल
धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी सनी देओलने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुमच्या घरीसुद्धा आईवडील आहेत, मुलंबाळं आहेत.. अशा शब्दांत त्याने पापाराझींना फटकारलं आहे. सनी देओलचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अशातच आजारपणाने आणि वृद्धापकाळाने खंगलेल्या धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पापाराझींनी पोस्ट केला. या व्हिडीओवरून आता सनी देओलने तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुरुवारी जेव्हा सनीने त्याच्या घराबाहेर पापाराझींना पाहिलं, तेव्हा तो त्यांच्यावर भडकला. तुम्हाला लाज नाही वाटत का, असा सवाल करत त्याने फोटोग्राफर्स आणि पापाराझींना फटकारलं आहे. सनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय म्हणाला सनी देओल?
“तुमच्याही घरी आई-वडील आहेत, मुलंबाळं आहेत. मूर्खासारखे व्हिडीओ का पोस्ट करत आहात? तुम्हाला जराही लाज वाटत नाही का,” असा सवाल त्याने पापाराझींना केला आहे. सनीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत आहे. त्याचं चिडणंही स्वाभाविक असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. ‘कोणालाही राग येईलच’ असं एकाने म्हटलंय. तर ‘सनी पाजीचा राग अगदी योग्य आहे’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
गेले दोन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेतल्यानंतर बुधवारी सकाळी धर्मेंद्र यांना घरी पाठवण्यात आलं. त्यांच्यावर पुढील उपचार घरीच करण्यात येणार असल्याची माहिती देओल कुटुंबीयांनी दिली. डॉक्टर प्रतित समदानी यांनीही कुटुंबीयांच्या आग्रहास्तव त्यांना घरी पाठवण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
काय म्हणाल्या हेमा मालिनी?
“गेले काही दिवस माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या फार कष्टाचे होते. धर्मेंद्रजींच्या प्रकृतीची आम्हा सर्वांनाच खूप काळजी आहे. त्यांच्या मुलांची तर झोपच उडाली आहे. अशा कठीण काळात मी कमकुवत होऊ शकत नाही, कारण माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. पण होय, ते घरी आल्यामुळे मी खुश आहे. ते रुग्णालयातून बाहेर पडले, याचा आम्हाला दिलासा आहे. जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासोबत त्यांनी राहणं गरजेचं आहे. बाकी तर सर्व देवाच्याच हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा”, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली आहे.
