सख्ख्या आईच्या प्रार्थनासभेत असं कोण येतं? हृतिक रोशनच्या पूर्व पत्नीवर भडकले नेटकरी
अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खानला नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहेत. यामागचं कारण म्हणजे आईच्या प्रार्थना सभेतील तिचा खास लूक. सख्ख्या आईच्याच प्रार्थना सभेला असं कोण जातं, असा सवाल करत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

ज्येष्ठ अभिनेते-निर्माते संजय खान यांची पत्नी आणि झायेद खान, सुझान खान यांची आई झरीन खान यांचं 7 नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्याच दिवशी हिंदू परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर काही दिवसांनी आता खान कुटुंबाने सोमवारी मुंबईत प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. या प्रार्थना सभेला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. झरीन यांची मुलगी आणि अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खानचा या सभेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सुझान पांढऱ्या रंगाची साडी नेसून आणि हातात एक बॅग घेऊन सभेच्या ठिकाणी आत प्रवेश करताना दिसतेय. याच व्हिडीओमुळे सुझानला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. सख्ख्या आईच्या प्रार्थनासभेत असं कोण येतं, असा सवाल नेटकरी करत आहेत.
या व्हिडीओमध्ये सुझान खान पूर्ण मेकअपमध्ये, नेलपेंट लावून आणि विशेष एम्ब्रॉयडरी असलेली साडी नेसलेली दिसून येत आहे. आईच्या प्रार्थना सभेला इतकं नटून-थटून कोण येतं, असा सवाल करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. ‘प्रार्थना सभेला आली आहेस की पार्टीला’, असंही एकाने म्हटलंय. तर ‘मॅचिंग नेलपेंट, मेकअप, महागडी बॅग, इतकी सुंदर साडी.. हे सर्व गरजेचं आहे का’, असा प्रश्न दुसऱ्या युजरने केला. ‘सख्ख्या आईच्या प्रार्थना सभेत असा लूक शोभतो का’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सुझानला ट्रोल केलंय.
सुझान खानचा व्हिडीओ
View this post on Instagram
कमेंट बॉक्समध्ये काहींनी सुझानची बाजूसुद्धा घेतली आहे. ‘जे लोक साडीवरून कमेंट करत आहेत, त्यांना सांगू इच्छिते की ती खास पारसी गारा वर्क केलेली ती साडी आहे. तिची आई पारसी होती. त्यामुळे त्यांच्या प्रार्थना सभेला काय घालून जावं, ही तिची निवड आहे’, असं एकाने स्पष्ट केलं. तर ‘फक्त प्रार्थना सभा आहे म्हणून कोणी कशाही अवस्थेत का येईल? ती तिच्या आईच्या पारसी संस्कृतीचा आदर करतेय. त्यासाठीच तिने पारसी गारा वर्क केलेली साडी नेसली आहे. ती तिची नेहमीची बॅग असेल. माझ्या मते ती योग्यरित्या तयार होऊन आली आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
झरीन खान यांच्या प्रार्थना सभेला हृतिक रोशन, त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद, मुलगा हृदान, मलायका अरोरा, राणी मुखर्जी, महिमा चौधरी, सलीम खान, अर्पिता खान शर्मा, झरीन खान आणि रजत बेदी यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.
