Swwapnil Joshi: स्वप्नील जोशी घरी परतताच मुलांनी दिलं खास सरप्राईज, VIDEO पाहून चाहतेही भावूक!
स्वप्निलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. मुलांचं निरागस प्रेम आणि बाबांसोबतचे हे क्षण अनेकांना भावले आहेत. अभिनयाच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबतचे क्षण जपणाऱ्या स्वप्निलच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Swwapnil Joshi: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशी आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास क्षणामुळे चर्चेत आला आहे. स्वप्निलने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. कामाच्या दौऱ्यावरून घरी परतल्यानंतर त्याच्या मुलांनी केलेलं स्वागत पाहून तो भारावून गेला. मुलांनी बाबांसाठी खास सरप्राईज तयार केलं होतं. या गोड क्षणांचा व्हिडीओ शेअर करत स्वप्निलने, ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?’ असं म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
मुलांनी धावत येऊन बाबांना मारली मिठी
स्वप्निल जोशीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर तो घरी परततो, तेव्हा घराची बेल वाजवतो. बेलचा आवाज ऐकताच त्याची मुलगी मायरा धावत येते आणि बाबांना घट्ट मिठी मारते. त्यानंतर मुलगा राघवही धावत येऊन स्वप्निलला मिठी मारतो. आपल्या मुलांना भेटल्यानंतर स्वप्नीलही त्यांचे लाड करताना दिसतो. या छोट्याशा भेटीतून मुलांचं बाबांवरील प्रेम आणि त्यांच्यातील जिव्हाळा पाहायला मिळतो. कामानिमित्त कितीही व्यग्र असलं, तरी घरी परतल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं हीच खरी कमाई असल्याची भावना या व्हिडीओतून व्यक्त होते.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
लेकीने दिलं स्वतःच्या हाताने बनवलेलं सरप्राईज
या व्हिडीओमधील आणखी एक गोड क्षण म्हणजे मुलांनी स्वप्निलसाठी तयार केलेलं सरप्राईज. राघव बाबांना सांगतो की, ते खूप दिवसांनी घरी आले आहेत आणि त्यांच्यासाठी खास सरप्राईज तयार केलं आहे. त्यानंतर मायरा स्वतः काढलेली दोन चित्रं बाबांना दाखवते. एका चित्रात फुलं आणि फुलपाखरू दिसतं, तर दुसऱ्या चित्रात सिंहाचं चित्र आहे. मायरा स्वप्निलला त्याला कोणतं चित्र आवडतं, असं विचारते. त्यावर स्वप्निल म्हणतो की, तिला जे योग्य वाटेल ते चित्र तो घेईल. मायरा सिंहाचं चित्र निवडते. त्यावर स्वप्निल तिचं कौतुक करत, चित्र तिच्यासारखंच गोड असल्याचं सांगतो.
मुलगा राघवनेही चारचाकीचं चित्र काढलं होतं. स्वप्निलने त्याच्याही कलेचं कौतुक केलं. मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या या भेटवस्तूंनी अभिनेत्याचा आनंद द्विगुणित केला. हा व्हिडीओ शेअर करताना स्वप्निलने लिहिलं की, कामाच्या ट्रिपवरून घरी परतल्यावर मुलं असं स्वागत करतात. विशेष म्हणजे, मुलं प्रत्येक वेळी त्याचं अशाच प्रेमाने स्वागत करतात, असंही त्याने सांगितलं. त्याच्या ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या कॅप्शनने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
