18 वर्षांनंतर ‘तारक मेहता..’ सोडणार बापूजी? प्रोमो पाहून भडकले नेटकरी; जेठालालही अस्वस्थ

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या कथानकात एक नवीन ट्विस्ट पहायला मिळणार आहे. सोशल मीडियावरील नव्या प्रोमोमध्ये बापूजींच्या निधनाच्या अफवा उडाल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावरून बापूजींची भूमिका साकारणारा कलाकार शो सोडणार असल्याची चर्चा आहे.

18 वर्षांनंतर तारक मेहता.. सोडणार बापूजी? प्रोमो पाहून भडकले नेटकरी; जेठालालही अस्वस्थ
दिलीप जोशी, अमित भट्ट
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 24, 2026 | 9:41 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणारी मालिका आहे. गेल्या काही वर्षांत काही कलाकार ही मालिका सोडून गेले आणि त्यांच्या जागी नव्या कलाकारांची निवड झाली. तरीही मालिकेची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. अशातच आता गेल्या 18 वर्षांपासून यामध्ये बापूजींची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट ही मालिका सोडून जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यामागचं कारण म्हणजे मालिकेचा नवीन प्रोमो. या प्रोमोमध्ये जेठालाल अत्यंत अस्वस्थ होऊन बापूजींचा शोध घेत आहे, कारण ते बेपत्ता झाले आहेत. गोकुळधाम सोसायटीमध्ये ही बातमी पसरताच सर्वांना मोठा धक्का बसतो. सर्वजण चंपकलाल गडा यांच्या शोधात आहेत.

‘तारक मेहता..’च्या या नव्या प्रोमोमध्ये दाखवलंय की, जेठालाल सोसायटीतील प्रत्येक घरात जाऊन बापूजींचा शोध घेत असतो. परंतु ते कोणाच्याच घरी नसतात. त्यातही अडचण अशी आहे की, बापूजींनी त्यांचा मोबाइल फोन घरी ठेवला आहे, त्यामुळे त्यांच्याशी फोनद्वारेही संपर्क साधता येत नाही. गोकुळधामचे सर्व रहिवासी बापूजींबद्दल चिंतेत असतात. त्यानंतर या कथेत मोठं वळण येतं. प्रोमोमध्ये जेठालाल कोणाशीतरी बोलताना दिसतो. तो विचारतो, “बापूजी तुमच्यासोबत आहेत का?” त्यावर जेठालालला त्या व्यक्तीकडून एक वाईट बातमी मिळते. ती व्यक्ती रडत म्हणते, “बापूजी गेले, ते आम्हा सर्वांना सोडून गेले.” हे ऐकून जेठालाल पूर्णपणे खचून जातो आणि फोनवरच तो ओरडायला लागतो. आता मालिकेत खरंच बापूजींचं निधन दाखवणार की हा फक्त एक गैरसमज आहे, हे एपिसोड प्रसारित झाल्यावरच कळेल.

पहा प्रोमो-

प्रेक्षकांना बापूजींच्या गायब होण्याचा हा ट्रॅक फारसा आवडलेला नाही. या प्रोमोच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी राग व्यक्त केला आहे. ‘निर्माते हीच जुनी गोष्ट आणखी किती काळ पुन्हा पुन्हा सांगणार आहेत’, असा सवाल एकाने केला. तर ‘काहीतरी नवीन का घेऊन येत नाहीत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘अत्यंत फालतू एपिसोड’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली आहे. बापूजींची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट ही मालिका सोडून जाणार असल्यानेच त्यांच्या निधनाविषयीचा ट्रॅक असा दाखवण्यात येत आहे, असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे.

Follow Us