संसदेत आज ‘पेपर लीक’वर महासंग्राम; राहुल गांधीं सरकारला घेरणार ? भाषणाकडे लक्ष
लोकसभेत 'अँटी पेपर लीक' विधेयकावरील चर्चा निर्णायक टप्प्यात आहे. परीक्षा प्रणालीत पारदर्शकता आणणे हा या विधेयकाचा उद्देश असला तरी, विरोधकांनी जुन्या पेपरफुटीची जबाबदारी घेण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींच्या सहभागामुळे या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले असून, सरकार आणि विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे. चर्चेनंतर विधेयकावर मतदान होणार आहे.

लोकसभेत सुरू असलेल्या ‘अँटी पेपर लीक’ विधेयकावरील चर्चा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून या विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होणार असून, चर्चा संपल्यानंतर विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधीही या चर्चेत सहभागी होणार असून, ते दुपारी सुमारे 12.30 च्या सुमारास सभागृहात आपली भूमिका मांडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारच्या मते, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे आणि पेपरफुटीच्या घटनांवर कठोर नियंत्रण ठेवणं, हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. मात्र, केवळ नवीन कायदा करून प्रश्न सुटणार नाही, तर सरकारने यापूर्वी झालेल्या पेपरफुटीच्या घटनांची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, असं विरोधकांचं म्हणण आहे. त्यामुळे बुधवारी सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक संघर्ष , शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे.
आज दुपारी लोकसभेत या बिलावर चर्चा होईल. चर्चा पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चा पूर्ण झाल्यानंतर विधेयकावर मतदान होईल. लोकसभेत मंजुरी मिळाल्यास हे विधेयक पुढील मंजुरीसाठी राज्यसभेत मांडले जाईल. सरकार या कायद्याला लवकरात लवकर मंजुरी मिळवून परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासोबतच, गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
राहुल गांधी यांच्या भाषणाकडे लक्ष
काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज या विधेयकावर त्यांची भूमिका मांडणार असून त्यांच्या सहभागामुळे या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विरोधकांकडून सातत्याने युवक, रोजगार आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींचे मुद्दे संसदेत उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे राहुल गांधी आपल्या भाषणात पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सरकारच्या भूमिकेवर टीका करून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे.
सरकार- विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप
पेपर लीक बिलाच्या चर्चेदरम्यान सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. यापूर्वीही असे कायदे करण्यात आले होते, मात्र तरीही पेपरफुटी थांबली नाही, असे सांगत केवळ नवीन कायदा पुरेसा ठरणार का, असा सवाल काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी उपस्थित केला. तर काँग्रेस नेत्या, प्रियंका गांधी यांनी माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या स्वागतावर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका व्हिडिओचा उल्लेख केला आणि युवकांशी संबंधित मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केलं. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी माजी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा विद्यार्थी आणि युवकांचा विजय असल्याचे म्हटले, तर असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारचा युवकांशी संपर्क तुटल्याची टीका केली.
दरम्यान, सरकारच्या वतीने अनुराग ठाकूर यांनी भूमिका मांडताना, “पेपरफुटी हा देशाच्या भविष्यासाठी गंभीर धोका असून त्याविरुद्ध सरकार कठोर भूमिका घेणार आहे,” असं स्पष्ट केलं. जुन्या कायद्यात सुधारणा करून परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत केले जात असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या पेपर लीक माफियांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असंही ठाकूर यांनी नमूद केलं.
चाय पे चर्चा
सभागृहात तीव्र वाद सुरू असतानाच, बाहेर मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. राज्यसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सभागृहाचे नेते जे. पी. नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे संसदेच्या कँटीनमध्ये एकत्र चहा घेताना दिसले. राजकीय संघर्षाच्या वातावरणात झालेल्या या अनौपचारिक भेटीची सर्वत्र चर्चा रंगली. आा आज लोकसभेत काय घडतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष एकवटलं आहे.
