
बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री कपूर घराण्याची सून होणार होती. रणबीर कपूर आणि करिश्मा-करीना कपूरचा चुलत भाऊ आदर जैनशी ती लग्न करणार होती. परंतु लग्नापूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला आणि आदरने या अभिनेत्रीच्या खास मैत्रिणीशीच लग्न केलं. आता या अभिनेत्रीने नुकतंच तिचं नवीन रिलेशनशिप जगजाहीर केलं आहे. सोशल मीडियावर एका अभिनेत्याच्या फोटोवर ‘माझा’ असं लिहित तिने हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर पहाडियाला डेट करणारी ही अभिनेत्री तारा सुतारिया आहे.
तारा सध्या तिच्या एका म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या म्युझिक व्हिडीओसाठी तिने गायक एपी ढिल्लनसोबत खास फोटोशूट केलंय. त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. ताराच्या या फोटोंवर वीरने केलेल्या कमेंट्सने सर्वांचं लक्ष वेधलं. ‘माझी’ असं लिहित त्याने स्टार आणि हृदयाचा इमोजी पोस्ट केला. त्यावर तारानेही ‘माझा’ अशी प्रतिक्रिया दिली. या कमेंट्समुळे दोघांचं रिलेशनशिप जगजाहीर झाल्याचं म्हटलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी तारा आणि वीर एकाच रेस्टॉरंटमध्ये दिसले. यावेळी पापाराझींनी दोघांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर जून महिन्यात दोघांनीही एका फॅशन शोमध्ये एकत्र रॅम्प वॉक केला होता आणि त्यानंतर इटलीला फिरायला गेले होते. वीर हा सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा मुलगा आहे. ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून त्याने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. याआधी तो अभिनेत्री सारा अली खानला डेट करत होता. अभिनेत्री मानुषी छिल्लरसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं होतं.
वीरने अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे वीरला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. प्रतिष्ठित कुटुंबातून आल्याने वीरला फिल्म इंडस्ट्रीत सहज संधी मिळाली, अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती. या ट्रोलिंगला वीरनेही सडेतोड उत्तर दिलं होतं. “अशा कुटुंबात जन्माला येणं हे माझं सौभाग्य आहे. आधीपासून माझं स्वप्न हेच होतं की मला कलाकार बनायचं आहे. मग आता त्यांना खुश करण्यासाठी मी काय करू? स्वत:ला मारून पुनर्जन्म घेऊ का?”, असा सवाल त्याने केला होता.