
‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचं नाव राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि अभिनेता वीर पहाडियाशी जोडलं जात आहे. परंतु त्यापूर्वी तारा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित कपूर कुटुंबातील आदर जैनला डेट करत होती. हे दोघं लग्नसुद्धा करणार होते. पण त्याआधीच त्यांचा ब्रेकअप झाला आणि आदरने ताराच्याच मैत्रिणीशी लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तारा तिच्या जुन्या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.
पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत ताराने सांगितलं की तिला तिच्या भूतकाळातील अनुभवांमधून बरंच काही शिकायला मिळालं. याआधीच्या रिलेशनशिप्सबद्दल ती पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की मी स्वत:ला ओळखत होते. आपण सर्वचजण आपल्या विशीत बऱ्याच नवीन गोष्टींचा अनुभव घेत असतो. मी असं पूर्णपणे म्हणू शकत नाही की ती माझी चूक होती. विशीत माझ्या आयुष्यात जे काही घडलं, त्यावर मला अभिमान आहे. किमान मी दररोज रात्री सन्मानाच्या भावनेनं झोपायला जायची. कारण मी कोणत्या गोष्टीसाठी उभी राहिले होते, हे मला नीट ठाऊक होतं. मी माझ्या खासगी आयुष्याला आधी महत्त्व दिलं, त्यानंतर व्यावसायिक आयुष्याकडे पाहिलं.”
या मुलाखतीत तारा तिच्या लग्नाविषयी आणि आताच्या रिलेशनशिप स्टेटसविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली. “मी कधीच परदेशातल्या मुलाशी लग्न करू शकत नाही. कारण मला आपली भारतीय संस्कृती, भारतीय जेवण सर्वाधिक आवडतं”, असं तिने सांगितलं. यावेळी ताराने एका व्यक्तीच्या प्रेमात असल्याची जाहीर कबुली दिली. परंतु तिने कोणाचं नाव घेतलं नाही.
इन्स्टाग्रामवरील एका कमेंटमुळे तारा आणि वीरच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यानंतर या दोघांना एअरपोर्टवरही एकत्र पाहिलं गेलं होतं. ताराने गायक एपी ढिल्लनसोबत फोटो पोस्ट केला होता. त्यावर वीर पहाडियाने ‘माझी’ अशी कमेंट करत हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता. तर दुसरीकडे तारानेही ‘माझा’ असं लिहिलं होतं. यावरून दोघांनीही त्यांचं नातं जगजाहीर करायचं ठरवलंय, हे नेटकऱ्यांच्या लक्षात आलं.