
कल्याण : अभिनेत्री कंगनाच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केल्यानंतर चर्चेत आलेल्या विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale) यांनी आता पुन्हा एक सनसनाटी विधान केलं आहे. टीव्हीवरील मालिकांबाबत (TV Serials) त्यांनी प्रेक्षकांना चांगलंच सुनावलं आहे. प्रेक्षकांनी भिकार सीरियल पाहणं बंद करावं, असं त्यांनी म्हटलंय. प्रेक्षकांशी ऑनलाईन संवाद साधताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी हे विधान केलंय. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी विक्रम गोखले यांनी प्रसार माध्यमांच्या बदलत्या स्वरुपाबाबत चिंतादेखील व्यक्त केली. लोकांच्या चॉईसवरुन त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य करत या व्याख्यानमालेत प्रेक्षकांना तिखट शब्दांत सुनावलं आहे. याच व्याख्यानमालेत नागराज मंजुळेंचं (Actor & Director Nagraj Manjule) कौतुकही विक्रम गोखलेंनी केलं. यावेळी त्यांनी आपल्याला नागराजसोबत काम करायला आवडेल, असं देखील म्हटलंय.
ऑनलाईन व्याख्यानमालेत अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलंय की,…
प्रेक्षकांनी स्वताचा चॉईस तपासून पहा! निश्चित करा! त्याच्यावर बंधने घाला.. आणि भिकार सीरीयल पाहणे बंद करा.. तुमचा वेळ वाया घालवू नका! तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील. म्हणजे मग चांगले दिग्दर्शक, नट लेखक येतील. म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, सीरीयल नक्की पहा.
राज्यभरातील प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी कल्याणामध्ये सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्राध्यापक रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना भिकार सीरीयल न पाहण्याचं आव्हान केलंय. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डीजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे, असंही ते म्हणाले.
आज प्रसारमाध्यमं पैशांच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी म्हटलंय. आज कोणताही अर्थ नसलेल्या सीरीयल घाल पाणी- घाल पीठ या न्यायाने प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी, कोरोना काळाचे वर्णन करणारी शॉर्ट फिल्म दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली असल्याचं म्हणत त्याचं कौतुकही केलंय. नागराज यांच्या शॉर्ट फिल्ममधून अतिशय विदारक सत्य चित्रित करण्यात आलं असून अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल गोखले यांनी त्यांचे कौतुक केलंय. तसंच आपल्याला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल असंही म्हटलंय.
Video | तृतीयपंथी आईच्या मुलाचा डान्स पाहून भारावले, मिथुनसह परिणिती, करणचेही डोळे पाणावले!
Hrithik Roshan | हृतिक रोशनसोबत हातात हात घालून जाणारी मिस्ट्री गर्ल कोण होती? उत्तर मिळालं!