‘द काश्मीर फाइल्स’नंतर येतोय ‘द वॅक्सिन वॉर’; 11 भाषांमध्ये प्रदर्शित होणार विवेक अग्निहोत्रींचा चित्रपट

विवेक अग्निहोत्री सांगणार वॅक्सिनची कथा; 'या' दिवशी प्रदर्शित होणार The Vaccine War

द काश्मीर फाइल्सनंतर येतोय द वॅक्सिन वॉर; 11 भाषांमध्ये प्रदर्शित होणार विवेक अग्निहोत्रींचा चित्रपट
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 10, 2022 | 1:51 PM

मुंबई- ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या यशानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा या वर्षातील बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे. आता विवेक अग्निहोत्रींचा ‘द वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 15 ऑगस्ट रोजी 11 विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एक अशी लढाई जी तुम्हाला माहीतही नाही की तुम्ही ती लढली आणि जिंकलीसुद्धा’, अशी ओळ या चित्रपटाच्या पोस्टरवर पहायला मिळतेय.

गुरुवारी सकाळी या चित्रपटाचा पहिला पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यामध्ये वॅक्सिनची बॉटल पहायला मिळतेय आणि त्यावरच चित्रपटाचं नाव लिहिण्यात आलं आहे.

‘भारताने लढलेल्या आणि आपल्या विज्ञानाच्या, धैर्याच्या आणि महान भारतीय मूल्यांच्या आधारे जिंकलेल्या एका लढाईची खरी आणि अविश्वसनीय कथा. 2023 मध्ये स्वातंत्र्यदिनी 11 विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे,’ अशी पोस्ट अग्निहोत्रींनी लिहिली.

एखादा भारतीय चित्रपट 11 भाषांमध्ये प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना महामारीदरम्यान भारताने तयार केलेल्या कोरोनाविरोधी वॅक्सिनची कहाणी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हिंदी, इंग्रजी, बांगला, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती आणि मराठी या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

विवेक अग्निहोत्रींची पत्नी पल्लवी जोशी या चित्रपटाची निर्माती आहे. ‘द काश्मीर फाइल्स’मझ्ये पल्लवीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता ‘द वॅक्सिन वॉर’मध्येही ती झळकणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.