7 वर्ष जुन्या क्राईम थ्रिलरचा OTT वर बोलबाला, टॉप 10 मध्ये जागा, थरकाप उडवणारी कहाणी…
ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग चित्रपट आणि मालिका मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात. 7 वर्षं जुना असलेला एक चित्रपट अलीकडेच ओटीटी ट्रेंडिंग लिस्टमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाचा तिसरा भाग देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे, ज्याची बरीच चर्चा आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर नेहमीच मनोरंजनाचा खजिना असतो. दर आठवड्याला, या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांचा पूर येतो, ज्यामुळे प्रेक्षकांना विविध जॉनरचे, मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होत असतात. त्याशिवाय अनेक जुने चित्रपटदेखील लोकप्रिय होतात आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. अलिकडेच असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. तब्बल 7 वर्ष जुन्या एका हिंदी चित्रपटाने नेटफ्लिक्सवरील टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे.
मर्दानी 2: क्राइम थ्रिलरचा जलवा
हा चित्रपट म्हणजे ‘मर्दानी 2’ . 2019 साली आलेला हा चित्रपट म्हणजे क्राईम थ्रिलर जॉनरचा आहे. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे बजेट 27 कोटी होतं. आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 47 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. शिवाय, जगभरातील त्याचे कलेक्शन 67 कोटींपेक्षा जास्त झालं होतं. या आकड्यांवर नजर टाकली तर हा चित्रपट सुपरहिट ठरला असंच म्हणावं लागेल.
मर्दानी 2 ची कहाणी
मर्दानी 2 हा सुमारे 1 तास 43 मिनिटं चालणार चित्रपट असून तो एका सनकी सीरियल किलरची कहाणी सांगणारा पिक्चर आहे. हा मारेकरी एकेक करूण अनेक मुलींचं अपहरण करतो आणि अत्याचार करून अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या करतो. या मारेकऱ्याला पकडण्यासाठी पोलिस जंग जंग पछाडतात, पण तो त्यांना सतत चकवत पळ काढत असतो. ही केस सोडवण्याची जबाबादारी महिला ऑफीसर शिवानी शिवाजी रॉयवर असते. अभिनेत्री रानी मुखर्जी हिने ही भूमिका साकारली आहे.
नेटफ्लिक्स वर ट्रेंडिंग
हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर 7 व्या स्थानावर ट्रेंड करत आहे. प्रेक्षकांना तो केवळ त्याच्या कथेसाठीच नाही तर राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयासाठीही आवडल्याचं दिसतं.मर्दानी फ्रँचायझीला एक वेगळी ओळख देऊन राणी मुखर्जीने चित्रपटात एक मजबूत आणि कणखर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाचा पुढा भाग, म्हणजे मर्दानी 3 हाही लवकरच रिलीज होणार असून, ही चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राणी मुखर्जी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परत दिसणार आहे. मर्दानी फ्रँचायझीचा तिसरा भाग येत्या 30 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पहिल्या दोन भागांना मिळालेलं यश पाहात, हा तिसरा भागही तितकाच यशस्वी ठरेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
ओटीटीवर कधी होणार रिलीज ?
एवढंच नव्हे तर या, मर्दानी 3 चित्रपटाची ओटीटी रिलीज तारीखही जाहीर करण्यात आली आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, “मर्दानी 3” हा चित्रपट 27 मार्चपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. त्यामुळे थिएटरमध्ये चित्रपट पाहिल्यानंतर, प्रेक्षक घरी बसून देखील मर्दानी 3 चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील. मर्दानी फ्रँचायझी केवळ एक थ्रिलर कथाच नाही तर महिलांच्या सुरक्षिततेचे आणि हक्कांचे मुद्दे देखील अधोरेखित करते. राणी मुखर्जीच्या कामामुळे चित्रपटाला चार चांद लागले आहेत.
