प्रत्येक मुलीसोबत झोपायचा..; आरोपांवर प्रसिद्ध अभिनेत्याने अखेर सोडलं मौन
बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावची बहीण प्रीतिका रावने अभिनेता हर्षद अरोरावर गंभीर आरोप केले होते. हर्षद स्त्रीलंपट आहे, असं तिने म्हटलं होतं. त्यावर आता हर्षदने प्रतिक्रिया दिली आहे. या दोघांनी एका मालिकेत एकत्र काम केलं होतं.

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता हर्षद अरोरा सध्या त्याच्या ‘हाले दिल’ या नव्या शोमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर अभिनेत्री प्रीतिका रावने गंभीर आरोप केले होते. हर्षद स्त्रीलंपट आहे, अशी टीका तिने केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हर्षदने प्रीतिकाच्या या आरोपांवर मौन सोडलं आहे. “या सर्व बालिश गोष्टी आहेत. जर तिने हे सर्व प्रसिद्धीसाठी केलं असेल तर ते खूप चुकीचं आहे”, असं तो म्हणाला. प्रीतिका राव ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावची बहीण आहे. अमृताने बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं, तर प्रीतिका टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कार्यरत आहे.
प्रीतिकाच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना हर्षद पुढे म्हणाला, “मी त्या सर्व गोष्टींना विसरून गेलोय कारण मला तिच्या पातळीवर घसरून सूड घ्यायचा नाहीये. मी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू शकलो असतो, पण मी तसं केलं नाही. जर तिच्या आरोपांमध्ये सत्य असतं तर इतर लोक समोर येऊन का बोलले नाहीत? मी तर अनेकांसोबत काम केलंय. हे सर्व इतक्या नंतर बोलण्याचा काय अर्थ आहे? जे लोक मला ओळखतात, त्यांना माहीत आहे की मी कसा आहे? मला कोणालाच स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. ही किती विचित्र गोष्ट आहे की तुम्ही दहा-बारा वर्षांपूर्वी एकासोबत काम करता आणि इतक्या वर्षांनंतर अचानक तुम्हाला त्या गोष्टींची जाणीव होते.”

हर्षद अरोरा आणि प्रीतिका राव यांनी ‘बेइम्तिहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेतील दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची खूप चर्चा झाली होती. 2014 मध्ये ही मालिका टेलिव्हिजनवर प्रसारित झाली होती. प्रीतिका आणि हर्षद यांची जोडी सोशल मीडियावर हिट झाली होती. या दोघांच्या केमिस्ट्रीचे अनेक व्हिडीओ कंटेट क्रिएटर्सकडून व्हायरल केले जातात. अशाच एका व्हिडीओवर प्रीतिकाने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. ‘तुला लाज वाटली पाहिजे. मी तुला सतत विनंती करूनही तू माझे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत राहिलीस. इंडस्ट्रीत भेटलेल्या प्रत्येक मुलीसोबत झोपणाऱ्या या व्यक्तीसोबतचे माझे व्हिडीओ पोस्ट करू नकोस’, असं तिने लिहिलं होतं. तिची ही कमेंट तुफान व्हायरल झाली होती. याविषयी प्रीतिकाशी संपर्क साधला असता तिने प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
