VIJETA MOVIE REVIEW : प्रत्येकामध्ये दडलेला असतो ‘विजेता’

ग्रामीण बाज, गावाकडच्या गोष्टी, सामाजिक संदेश यापलिकडे जाऊन मराठी चित्रपटांमध्ये आता वेगवेगळे प्रयोग होऊ लागलेत (Movie review of VIJETA). अमोल शेटगे दिग्दर्शित 'विजेता'नं ह्या रेषा अजून गडद केल्या आहेत.

VIJETA MOVIE REVIEW : प्रत्येकामध्ये दडलेला असतो 'विजेता'

ग्रामीण बाज, गावाकडच्या गोष्टी, सामाजिक संदेश यापलिकडे जाऊन मराठी चित्रपटांमध्ये आता वेगवेगळे प्रयोग होऊ लागलेत (Movie review of VIJETA). अमोल शेटगे दिग्दर्शित ‘विजेता’नं या रेषा अजून गडद केल्या आहेत. स्पोर्ट्स ड्रामा मराठीत फार क्वचितच बघायला मिळतो. पण या सिनेमात दिग्दर्शक अमोल शेटगेंनी ज्या पध्दतीनं हे विश्व उभारलं आहे ते लाजवाब आहे.

मैदानावरचा रोमहर्षक थरार या सिनेमात आपल्याला बघायला मिळतो. हिंदी किंवा इतर अन्य प्रादेशिक भाषांमधले स्पोर्ट्सवर आधारित चित्रपट बघितले तर एकाच खेळाला केंद्रबिंदू करुन त्यांची कथानकं आखली होती, मात्र हा सिनेमा याच बाबतीत उजवा ठरतो. कारण या सिनेमात एकापेक्षा जास्त खेळांचा थरार आपल्याला बघायला मिळतो. सुबोध भावे, सुशांत शेलार, पूजा सावंत, मानसी कुलकर्णी, प्रीतम कांगणे, सुहास पळशीकर, अजित भुरे, माधव देवचके, दीप्ती धोत्रे, तन्वी परब, देवेन्द्र चौघुले, अनुराधा राजाध्यक्ष, ललित सावंत अशी भली मोठी कलाकारांची फौज या सिनेमात आहे. सगळ्या कलाकारांना सिनेमात दिग्दर्शक अमोल शेटगेंनी योग्य न्याय दिलाय. सिनेमातलं प्रत्येक पात्र लक्षात राहतं. सिनेमात काही किंतू-परंतू आहेत, पण त्याकडे जर कानाडोळा केला, तर हा सिनेमा खऱ्या अर्थाने ‘विजेता’ ठरलाये.

महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमीच्या डीन वर्षा गायकवाड (मानसी कुलकर्णी) यांना काहीही करुन यंदाच्या नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राचा झेंडा फडकवायचा असतो. त्यामुळे सौमित्र देशमुखची (सुबोध भावे) ते अकॅडमीचा माईंड कोच म्हणून नियुक्ती करतात. पण सौमित्रचा भूतकाळ वाईट असतो. त्याला अकॅडमीतून 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं असतं. त्यामुळे हेडकोच भटकळ (सुशांत शेलार) यांचा सौमित्रच्या नियुक्तीला कडाडून विरोध असतो. काही खेळाडूंनाही तो सौमित्रच्या विरोधात उभा करतो. ही सगळी आव्हानं असतांनाही सौमित्रनं काहीही करुन यंदा बाजी मारायचीच हा जणू निश्चयच केलेला असतो.

नलिनी जगताप (पूजा सावंत), सुनंदा गुजर (प्रीतम कांगणे), सोनिया कर्णिक (तन्वी परब) , देवेंद्र जाधवकर (देवेंद्र चौघुले), जगदीश मोरे (गोरीश शिपूरकर), राहुल थोरात (माधव देवचके), सपना (कृतिका तुळसकर), कविता (दीप्ती धोत्रे) या सगळ्या खेळाडूंना एकत्र आणून तो उत्तम संघबांधणी करतो. आता सौमित्र या सगळ्यांना एकत्र कसा आणतो?, त्यांच्यातील आत्मविश्वास परत कसा आणतो? स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा फडकतो का?, सौमित्र देशमुखचा भूतकाळ काय असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला ‘विजेता’ बघावा लागेल.

या सिनेमाशी ‘शोमॅन’ सुभाष घईंचं नाव जोडल्यामुळे साहजिकचं या सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. हा सिनेमा तुमचा अपेक्षा भंग करणार नाही. तांत्रिक बाबी असतील किंवा कलाकारांचा अभिनय असेल हा सिनेमा सगळ्याच गोष्टीत उजवा ठरलाय. दिग्दर्शक अमोल शेटगेंनी सिनेमाची गती उत्तम ठेवलीय. अमोलनं इमोशन्स, इर्ष्या, थरार, जिद्द या सगळ्याची उत्तम सांगड घातल्यामुळे हा सगळा मामला मस्त जुळून आलाय. एवढे सगळे कलाकार एकत्र आल्यावर प्रत्येकाला योग्य स्पेस देणं सोपी गोष्ट नाही, पण ही किमया अमोल शेटगेंनी लीलया साधली आहे.

सिनेमात काही किंतू-परंतू आहेत. सिनेमात काही अनावश्यक प्रसंगांची पेरणी टाळता आली असती. काही खेळाच्या दृश्यांमध्ये अजून थरार वाढवता आला असता. तसेच प्रत्येकाचा एक भूतकाळ सिनेमात दाखवण्यात आलाय. सुबोध सिनेमात माईंडकोच दाखवला असल्यामुळे ते योग्यही आहे. मात्र जर ती दृष्यं आटोपशीर घेऊन मैदानावरचा थरार अजून खुलवला असता तर मजा आली असती. सिनेमाचा क्लायमॅक्स मस्त जमलाय. एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते की, हा सिनेमा बघितल्यावर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या अनेक युवा खेळाडूंना स्वत:मध्ये दडलेला ‘विजेता’ सापडेल.

माईंडकोच सौमित्रच्या भूमिकेत सुबोध भावेनं उत्तम काम केलंय. बऱ्याच प्रसंगात त्याची भेदक नजर बरंच काही बोलून जाते. पूजा सावंत नलिनीच्या भूमिकेत इम्प्रेसिव्ह वाटलीये. आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारी नलिनी तिनं उत्तम वठवलीये. प्रीतम कांगनेने सुनंदाच्या भूमिकेत चांगलं काम केलंय, पण तिला संवादफेक अजून सुधारण्याची गरज आहे. त्यावर तिनं मेहनत घेतली तर नक्कीच ती अजून उत्तम भूमिकांमध्ये दिसेल. या सिनेमात मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय सुशांत शेलारचा. बऱ्याच वर्षांनी सुशांतला एवढी चांगली भूमिका मिळालीये. त्यानेही मिळालेल्या संधीचं सोनं करत जोरदार फटकेबाजी केलीये. हेड कोच भटकळच्या भूमिकेत सुशांत लक्षात राहतो. स्पष्टवक्ता, बेरक्या पण वेळप्रसंगी तितकाच हळवा भटकळ त्यानं उत्तम रंगवलाये. सुहास पळशीकरांनीही छोट्या भूमिकेत लक्ष वेधलं आहे. सिनेमातील इतर कलाकारांनीही उत्तम कामं केलीयेत.

सिनेमाचं कॅमेरावर्क उत्तम आहे. उदय मोहितेचा कॅमेरा भन्नाट फिरलाये. रोहन-रोहननं संगीतबध्द केलेलं टायटल ट्रॅक आणि लढ रे ही गाणी मस्त जुळून आलीयेत. टायटल ट्रॅकचा संपूर्ण सिनेमात बॅकग्राऊंडला उत्तम वापर करण्यात आलाये. एकूणच काय तर विजेता खऱ्या अर्थाने ‘विनर’ आहे. गेल्या काही महिन्यात जे मराठी चित्रपट आलेत त्यामध्ये ‘विजेता’ नक्कीच चार पाऊलं पुढे आहे. हा सिनेमा चालला तर नक्कीच निर्मात्यांना, दिग्दर्शकांना मराठीत असे प्रयोग करायला बळ मिळेल. हा स्पोर्ट्स ड्रामा तुम्हाला निराश नाही करणार. ‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स.

Movie review of VIJETA

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI