
छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये काम करणारे अनेक कलाकार बऱ्याच वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या लक्षात असतात. आपल्या दमदार अभिनयकौशल्याने या कलाकारांनी विशेष छाप सोडलेली असते. म्हणूनच मालिका संपल्यानंतर कित्येक वर्षांनंतरही त्यांना ओळखणं प्रेक्षकांसाठी सोपं असतं. 2008 मध्ये अशी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि ती तुफान लोकप्रिय ठरली होती. या मालिकेचं नाव आहे ‘उतरन’. नेहमीच्या सासू-सुनेच्या कथेपेक्षा या मालिकेची कथा वेगळी होती. म्हणूनच प्रेक्षकांना ती खूप आवडली. या मालिकेतून रश्मी देसाई आणि टिना दत्ता या अभिनेत्रींना प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘उतरन’मुळे या दोघी अभिनेत्री घराघरात पोहोचल्या. मात्र यामध्ये छोट्या इच्छाची भूमिका साकारणारी मुलगी तुम्हाला आठवतेय का? तिचं नाव स्पर्श खानचंदानी असं आहे. ‘उतरन’मध्ये लहानपणीच्या इच्छाची भूमिका साकारणारी स्पर्श आता 22 वर्षांची झाली आहे.
मालिकेतील आपल्या भूमिकेने स्पर्शने अनेकांना भावूक केलं होतं. प्रेक्षकांना ती खूप जवळची वाटू लागली होती. आता तीच स्पर्श मोठी झाली असून तिला ओळखणंही कठीण झालं आहे. स्पर्श सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते. स्पर्शला अभिनयाशिवाय डान्सचीही फार आवड आहे. शास्त्रीय नृत्याच्या पोशाखातील तिचे फोटोसुद्धा इन्स्टाग्रामवर पहायला मिळतात.
स्पर्शच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. ‘उतरन’ या मालिकेनंतर स्पर्श फारशी कुठे झळकली नाही. अभिनयापासून दूर ती तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत होती. ‘उतरन’नंतर तिने ‘परवरिश’, ‘सीआयडी’ आणि ‘दिल मिल गए’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. स्पर्शला शेवटचं ‘विक्रम बेताल’ या मालिकेत पाहिलं गेलं होतं.
कलर्स टीव्हीवरील ‘उतरन’ ही मालिका 2008 पासून 2015 पर्यंत चालली होती. यामध्ये टिना दत्ता, रश्मी देसाई, नंदिश संधू, रोहित खुराना, श्रीजिता डे आणि मृणाल जैन यांच्याही भूमिका होत्या. ही टेलिव्हिजनवरील सर्वाधिक काळ चाललेली तिसरी मालिका होती.