Vandana Gupte : मला अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या…अमराठी रिक्षावाल्याची अरेरावी, वंदना गुप्तेंनी घडवली अद्दल, रिक्षाच केली पलटी
Vandana Gupte : वंदना गुप्ते यांनी एकदा अमराठी रिक्षावाल्याला चांगलीच अद्दल घडवली होती. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

वंदना गुप्ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि बेधडक व्यक्तिमत्वामुळे ओळखल्या जातात. जर एखादी गोष्ट त्यांना खटकली तर तिथल्या त्या सुनावतात. वंदना गुप्ते शिस्तप्रिय आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी अमराठी रिक्षावाल्याचा किस्सा सांगितला आहे. वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘मला वाटतं की आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जी भाषेवरून मोहिम चालू आहे ती बरोबर आहे कारण त्यांना ताळ्यावर आणलंच पाहिजे. मी टॅक्सीवाल्यांसारखी गाडी चालवते. तशी चालवली नाही, तर तुम्ही एकदम धिम्या गतीने चालवत बसाल. मुंबईत अशी गाडी चालवून फायदा नाही हे मी आधीच शिकले आहे.’
वंदना गुप्ते यांनी सांगितला प्रसंग
रिक्षावाल्याचा प्रसंग सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘एकदा मी प्रयोग करून येत होते. त्याच रात्री मला अमेरिकेला दौऱ्याला जायचं होतं. शिवाजी मंदिरचा प्रयोग करून रात्री दीड वाजता आम्हाला एअरपोर्टसाठी जायचं होतं. मी गाडी घेऊन निघाले, माझ्यासोबत सुधीर बर्वे होते. रस्त्यात एका रिक्षावाल्याला मी ओव्हरटेक करून पुढे गेले. त्याला या गोष्टीचा इतका राग आला की, त्याने मला अर्वाच्च भाषेत शिव्या द्यायला सुरुवात केली. ते मी ऐकलंच. त्यावेळी एसी गाड्या नसल्यामुळे खिडक्या उघड्या असायच्या. मी ते ऐकलं आणि सांताक्रुझ पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या डिव्हायडरच्या इथे मी मुद्दामून त्याच्या आडवी गाडी घातली. त्याला दुसरीकडे गाडी घालता येत नव्हती ते बघून मी गाडीतून खाली उतरले.’
‘मी त्याला विचारलं तू मला काय म्हणालास? तर तो मला उर्मटासारखंच म्हणाला ‘मैंने क्या बोला!’ मग मी त्याच्या मागे बसलेल्या पॅसेंजरला विचारलं, हा काय बोललं ते तुम्ही ऐकलंत का? तर ते म्हणाले, हो आम्ही ऐकलं खूप चुकीचं बोलला तो. मग मी त्याला ती शिवी बोलून दाखवली आणि म्हटलं हे तू असं का म्हणालास? तर तो मला बोलला की, ‘तुम कैसे गई मेरे गाडी के सामने से!’ मग मी त्याला त्याच्या रिक्षातून खाली उतरवलं आणि त्या पॅसेंजरला पण म्हणाले की, तुम्हाला तुमचा जीव प्यारा असेल तर तुम्ही पण खाली उतरा.’
‘खरं तर आमच्या बिल्डिंगच्या खाली रिक्षामध्ये ऑईलींग करतात ते दुकान आहे. त्यामुळे मी ते पाहत असल्यानं रिक्षा तिरपी कशी करतात हे मला ठाऊक आहे. मग मी तशीच रिक्षा तिरपी करून खाली अलगद पाडली. रिक्षावाला बघत बसला आणि मला मागून बोलत होता की, ‘ये आप क्या कर रहे हो!’ त्याच्यासमोरच मी माझे हात झटकले आणि पुढे गेले कारण मला पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जायला वेळ नव्हता. कारण, माझी फ्लाईट होती. तेव्हा संध्याकाळचे साडेसात-आठ वाजले होते. शिवाजी मंदिरचा प्रयोग संपून मी माझ्या घरी जात होते. त्यामुळे तिथल्या तिथे मी त्याला उत्तर दिलं होतं.’ असं वंदना गुप्ते शेवटी म्हणाल्या. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन‘ला दिलेल्या मुलाखतीत वंदना गुप्ते बोलत होत्या.
