
एस. एस. राजामौली त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘बाहुबली’, ‘RRR’ यांसारख्या त्यांच्या पॅन इंडिया चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. त्यानंतर आता ते आगामी ‘वाराणसी’ या चित्रपटासाठी चर्चेत आले आहेत. या चित्रपटासाठी ते पहिल्यांदाच साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत काम करत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रासुद्धा मुख्य भूमिकेत आहे. शनिवारी हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये या चित्रपटाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात प्रियांका आणि महेश बाबूने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. निक जोनासशी लग्नानंतर प्रियांका भारतातील फार मोजके प्रोजेक्ट्स हाती घेत आहे. ‘वाराणसी’ हा त्यापैकीच एक आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
महेश बाबूप्रमाणेच प्रियांका चोप्राचाही राजामौलींसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचं नाव आधी ‘SSMB29’ असं ठेवण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी प्रियांकाने तगडी फी स्वीकारली आहे. तिने तब्बल 30 कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय. याआधी राजामौलींच्या ‘आरआरआर’ या चित्रपटासाठी आलिया भट्टने 9 कोटी रुपये फी घेतली होती. परंतु त्यात तिची भूमिकासुद्धा छोटीच होती. तर ‘बाहुबली’ या चित्रपटासाठी अनुष्का शेट्टीने 5 कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं. या सर्वांच्या तुलनेत प्रियांकानेच राजामौलींच्या चित्रपटासाठी आतापर्यंतचं सर्वाधिक मानधन घेतलं आहे.
दुसरीकडे महेश बाबू आणि राजामौली यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत एक विशेष करार केला आहे. ‘वाराणसी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जेवढी कमाई करेल त्याचा 40 टक्के भाग मानधन म्हणून हे दोघं घेणार आहे. निर्मात्यांना महेश बाबू आणि राजामौली या जोडगोळीवर पूर्ण विश्वास असल्याने त्यांनीसुद्धा ही अट मान्य केल्याचं कळतंय. राजामौलींचा प्रत्येक प्रोजेक्ट निराळा असतो आणि बॉक्स ऑफिसवर तो सुपरहिट ठरेल याची खात्री निर्मात्यांना असते. म्हणून नफ्यातील वाटा त्यांना देण्यासाठी निर्मातेसुद्धा तयार आहेत.
दरम्यान हैदराबादमध्ये पार पडलेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात प्रेक्षकांना ‘वाराणसी’ची झलक पहायला मिळाली. यावेळी महेश बाबूचा चित्रपटातील फर्स्ट लूकसुद्धा शेअर करण्यात आला होता. हा चित्रपट 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या टीझरची सुरुवात वाराणसी नगरीनेच होते. त्यानंतर अनेक ऋषी हवन करताना दिसून येतात. त्याच हवनच्या अग्नीतून क्षुद्रग्रहाचा जन्म होतो, जो थेट आकाशातून अंटार्क्टिकामध्ये वाहणाऱ्या बर्फाळ नदीत कोसळतो. यानंतर थेट आफ्रिकेची झलक पहायला मिळते, जिथे अनेक जनावरं आहे. तिथेच वानर आणि त्यानंतर हनुमानाची झलक दिसते. हनुमानाला लंका जाळताना मोशन पोस्टरमध्ये दाखवलं गेलंय.