Varsha Usgaonkar : माझ्यावर अन्याय…वर्षा उसगांवकर यांची नाराजी, माधुरीच्या ‘चोली के पिछे क्या है’बद्दल स्पष्टच बोलल्या
Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांनी माधुरी दीक्षितच्या 'चोली के पिछे क्या है' गाण्याबद्दल भाष्य केलं आहे.

मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हिंदी चित्रपटात काम करतानाचाकिस्सा सांगितला. अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याचा संदर्भ देत त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ‘आंचल के अंदर क्या है‘ या गाण्याबद्दल बोलताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, ‘माझ्या गाण्यावर अन्याय झाला. ‘चोली के पिछे क्या है’ ते शब्द राहिले आणि माझं जे आहे, ‘चोली के अंदर क्या है’, असं जितेंद्र विचारतो. त्यावर ‘चोली में तबाही है’ असे ते शब्द होते. तर त्यांनी काय करावं की, ‘होली में तबाही है, तबाही’ का तर होळी खेळत होतो म्हणून. माझ्यावर अन्याय झाला ना आणि माधुरी दीक्षितवर अन्याय नाही झाला. ते चोली के पिछे राहिले. सेन्सॉर बोर्डामुळे नेमकं चोलीच्या जागी होळी करावं लागलं. मला ‘चोली में तबाही है, तबाही’ असं असतं तर आवडलं असतं.’
‘हे गाणं जया प्रदा यांच्यावर शूट होणार होतं. सावन कुमार तक दिग्दर्शक आणि निर्माते होते. ते म्हणाले, नाही नाही, हे गाणं वर्षासोबतच शूट झालं पाहिजे. त्यात मी पत्रकार होते. जी थोडी बोल्ड असते. सिगारेट ओढत असते. त्यावेळी मला कधी एकदा हा सीन होतोय असं व्हायचं, कारण सिगारेट हातात कशी धरायची इथपासून सुरुवात होती. जया प्रदा, जरा रुसल्या मग. त्यांनी माझ्याशी अबोला नाही धरला, त्या गोडच होत्या तशा. त्या म्हणाल्या, मलाही हे गाणं शूट करायचं आहे. मला तुम्ही इतकं सोज्वळ का समजता? दिग्दर्शक जया यांना म्हणाले की, मी तुम्हाला एक खूपच चांगलं गाणं देतो, ज्यामध्ये तुम्हाला हेवा वाटतो आणि तुम्ही दारू पिता आणि रागाने वर्षा व जितेंद्र यांच्याकडे बघता. तेव्हा त्या शांत झाल्या, नाहीतर त्यांनी माझ्याशी अबोला धरला असता.’ असं वर्षा यांनी पुढे सांगितलं.
