फुटपाथवर साडी विकणारा, ते टॉप प्रोड्युसर..! कसं उभ केलं कोट्यवधींचं साम्राज्य ?
वासू भगनानी यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे. फुटपाथवर साड्या विकण्यापासून ते बॉलिवूडमधील टॉप प्रोड्युसर बनण्यापर्यंतचा त्यांचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे. पूजा एंटरटेनमेंटचे संस्थापक म्हणून त्यांनी 'कुली नं. 1' सारखे अनेक यशस्वी चित्रपट दिले. अनेक अडचणींचा सामना करत, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी यशाचे शिखर गाठले.

शोबिझमध्ये आज असे अनेक चेहरे आहेत, जे खूप यशस्वी आहेत. त्यांचं कोट्यवधींचं साम्राज्य पसरलंय. पण अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर ते आज या पदावर, यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे वासू भगनानी. बॉलिवूडमधील टॉप प्रोड्युसर्सपैकी एक असलेल्या वासू भगनानी यांचं आज खूप नाव आहे. पण एक वेळ अशी होती की ते फुटपाथवर उभं राहून चक्क साडी विकायचे. ‘रावाचा रंक’ होण्याचा त्यांचा हा प्रवास खूपच प्रेरक आहे.
वासू भगनानी हे पूजा एंटरटेनमेंटचे संस्थापक आहेत. त्यांच्या बॅनरने ‘कुली नं. 1’, ‘हीरो नं. 1’ आणि ‘बीवी नं. 1’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. कमर्शिअल बॉविडू उभं करण्यासाठी त्यांनी अनेक दशकं अथक मेहनत केली. त्यांच्या कंपनीने आत्तापर्यंत 40 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘जिंदाबाद’ पॉडकास्टशी बोलताना, वासू भगनानी यांनी त्यांचा संघर्ष, व्यावसायिक उपक्रम आणि ज्या क्षणामुळे त्यांचं आयुष्य कायमचं बदललं, त्या क्षणाबद्दल मोकळेपणाने सांगितलं.
खडतर प्रवास
या पॉडकास्टदरम्यान वासू यांनी खडतर प्रवासाबद्दल सांगितलं. ते म्हणाले, ” एक काळ असा होता की मी फुटपाथवर साड्या विकायचो. 13 वर्षांचा जो मुलगा रस्त्यावर साड्या विकत होता, तो आज इथपर्यंत पोहोचला आहे. हाँ प्रवास मला आणि माझ्या कुटुंबाच्या, माझ्या मुलांच्या नेहमी लक्षात राहील. त्या वेळी माझं कुटुंब कोलकात्यात राहत होतं, पण तिथे मर्यादित संधि होती. कोलकात्यात आम्ही चार भाऊ होतो आणि पर्यायही मर्यादित होते. त्यामुळे, आम्ही ठरवलं की एका भावाने दिल्लीला जावे. हा निर्णय म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. मी दिल्लीला जाऊन प्रीत विहारमध्ये जमिनीचा एक छोटा भूखंड विकत घेतला. एवढंच नव्हेतर मी नंतर आनंद विहारसारख्या भागांमध्ये भूखंड विकत घेतले आणि तिथे व्हिला बांधून ते विकले. त्यानंतर, शाकरपूरमध्ये व्हीआयपी बिल्डिंग नावाची एक इमारत आहे, जी मी चार महिन्यांत बांधून उभी केली. ” असं वासू भगनानी म्हणाले.
होळीला मुंबईत आलो आणि..
” तिथून मी बांधकाम क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. कोलकात्यात आमचा साड्यांचा व्यवसाय होता. पण मुंबईने माझा प्रवासच बदलून टाकला. आम्ही होळीच्या वेळी मुंबईत आलो आणि दिल्लीला परत कधीच गेलो नाही. हे नशिबातच होतं. मी मुंबईत स्थायिक होईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी होळीसाठी मुंबईत आलो होतो आणि इथेच राहिलो. प्लॉट खरेदी केले आणि कन्स्ट्रक्शन सुरू केलं. माझा व्यवसाय वेगाने पसरला, तीन-चार वर्षांत मी 12-15 इमारती बांधल्या. काम वाढू लागलं, मग मी ऑडियो कॅसेट बनवण्याचं काम सुरू केलं, ” असा अनुभव त्यांनी सांगितला.
10 हजारांपासून केली सुरूवात ते..
मी 10 हजार रुपयांपासून सुरुवात केली आणि तिथूनच ती कंपनी नामांकित, टॉप कंपन्यांपैकी एक बनली. आम्ही दररोज 3 लाख पीस तयार करायचो, ही कामगिरी भारतात आजपर्यंत कोणीही केली नव्हती, असं ते म्हणाले. . त्यानंतर मी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘आँखें’ हा चित्रपट पाहिल्यावर तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. मी घरी परत आलो आणि ठरवलं की डेव्हिड (डेव्हिड धवन) आणि गोविंदा यांना साईन करायचं. दुसऱ्याच दिवशी सकाळी पैसे घेऊन मी तिथे पोहोचलो आणि पिक्चर साईन केला, अशी आठवण त्यांनी सांगितली.
गेल्या अनेक वर्षांत वासू भगनानी यांनी अनेक फिल्म्स प्रोड्यूस केल्या. त्याच्या बॅनरखाली नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये ‘मिशन राणीगंज’, ‘गणपत’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यांचा समावेश आहे. पण, यशस्वी चित्रपटांच्या दरम्यान, फ्लॉप चित्रपटांमुळे वासू भगनानी यांना तोटाही सहन करावा लागला आहे. असं असूनही, आजही ते या क्षेत्रात खंबीरपणे टिकून राहिले आहेत. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (साल 2024 ), हा त्यांचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट, बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला.