सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) अंत्यसंस्कार केले जातील. सुमन कल्याणपूर यांनी हिंदी आणि मराठीत अनेक अजरामर गाणी गायली आहेत.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या सुमधुर आवाजाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक सुवर्णपर्व संपलं आहे. आज (सोमवार) दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवशक्ती अपार्टमेंट इथं ठेवण्यात आलं. त्यानंतर दुपारी 2 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली. यावेळी पोलिसांकडून त्यांना सन्मानाने सलामी देण्यात आली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी देखील आपल्या गुरुतुल्य गायिकेचं अंतिम दर्शन घेतलं. यावेळी त्या भावूक झाल्या होत्या. सुमन कल्याणपूर यांनी हिंदी आणि मराठीत अनेक अजरामर गाणी गायली आहेत. ‘ना तुम हमे जानो’, ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘रिमझिम के तराने लेके’ तसंच ‘केतकीच्या बनी’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’ ही गाणी रसिकांच्या ओठावर कायम राहतील.
सुमन कल्याणपूर यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक हरहुन्नरी आणि सुरेल गायिका गमावली आहे. संगीत क्षेत्राची ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील गोडवा आणि त्यांनी गायलेली गाणी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनात घर करून राहतील. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुमन यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या सुमधूर आवाजाच्या बळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’ अशी अनेक गाणी त्यांनी आपल्या सुमधूर आवाजाने अजरामर केली आहेत.
सुमन कल्याणपूर यांचं लग्नाआधीचं नाव सुमन हेमाडी असं होतं. बांगलादेशमधल्या ढाका इथं 1937 साली त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर 1943 मध्ये त्यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. इथूनच त्यांच्या गायनाच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या सुमन कल्याणपूर म्हणून परिचित झाल्या. त्यांनी पंडित लक्ष्मणराव अमृते यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. 1954 मध्ये ‘दरवाजा’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिलं पार्श्वगायन केलं. लता मंगेशकर यांच्या गायकीशी साम्य असल्यामुळे सुरुवातीला त्यांना काही संगीतकारांनी ‘दुसरी लता’ म्हणून पाहिलं.
‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई’, ‘कशी गवळण राधा बावरली’, ‘केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर’, ‘केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’, ‘देव माझा विठु सावळा’, ‘उठा उठा चिऊताली’ अशा त्यांनी गायलेल्या विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला.