Vikrant Massey: विक्रांत मेस्सी उभारतोय खरा ‘मुसाफिर कॅफे’; 20 खोल्यांची खास सोय

'मुसाफिर कॅफे' या वेब सीरिजमुळे लोकप्रियता मिळवलेला विक्रांत मेस्सी आता 'मुसाफिर कॅफे'चा अनुभव प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तो दोन नवीन कॅफे सुरू करणार आहे.

Vikrant Massey: विक्रांत मेस्सी उभारतोय खरा मुसाफिर कॅफे; 20 खोल्यांची खास सोय
विक्रांत मेस्सी, मुसाफिर कॅफे
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2026 | 10:14 AM

Vikrant Massey: अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता विक्रांत मेस्सी ‘मुसाफिर कॅफे’ या वेब सीरिजमुळे चांगलाच चर्चेत आला. या सीरिजनंतर आता तो व्यवसायाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. ‘मुसाफिर कॅफे’ या वेब सीरिजच्या यशानंतर विक्रांत या प्रोजेक्टशी आणखी एका वेगळ्या माध्यमातून जोडला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रांत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ‘मुसाफिर कैफे’ नावाने दोन नवीन कॅफे सुरू करणार आहे. ‘व्हरायटी’ने दिलेल्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये या दोन्ही कॅफेंच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, हे कॅफे सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या कॅफेसारखेच डिझाइन केले जाणार आहेत. त्यामुळे ‘मुसाफिर कॅफे’ची काल्पनिक दुनिया आता पडद्याबाहेर प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे.

या कॅफेची आणखी एक खासियत म्हणजे इथे कलाकारांसाठी सुमारे 20 खोल्यांची आर्टिस्ट रेसिडेन्सी असणार आहे. देश-विदेशातून येणाऱ्या कलाकारांना इथे राहून आपल्या क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्सवर काम करता येईल. त्यामुळे हे ठिकाण केवळ कॅफे न राहता कलाकारांसाठी एक क्रिएटिव्ह स्पेस म्हणूनही विकसित होण्याची शक्यता आहे.

विक्रांत मेस्सीने ‘मुसाफिर कॅफे’ या वेब सीरिजमध्ये चंदर ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चंदर हा कॉर्पोरेट जगतातील धावपळीपासून दूर जाऊन डोंगरांमध्ये शांत आयुष्य जगण्याचं आणि स्वतःचं कॅफे सुरू करण्याचं स्वप्न पाहतो. त्यामुळे सीरिजमधील त्याच्या पात्राच्या स्वप्नाशी आता विक्रांतचा हा नवीन व्यावसायिक उपक्रम जोडला जात असल्याचं चित्र आहे.

‘मुसाफिर कॅफे’ची कथा चंदरच्या आयुष्यासोबतच वेदिका पिंटो या महत्त्वाकांक्षी आणि स्वतंत्र विचारांच्या तरुणीभोवती फिरते. मुंबईत मोठी सिव्हिल लॉयर होण्याचं स्वप्न पाहणारी वेदिका कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबत स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करते. मालिकेत महिमा मकवाना हिनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ती मसुरीमध्ये चंदरसोबत ‘मुसाफिर कॅफे’ चालवताना दाखवण्यात आली आहे.

सीरिजची कथा वेगवेगळ्या काळातून पुढे जात असून त्यात प्रेम, स्वप्नं, नातेसंबंध आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्ग निवडण्याची धडपड दाखवण्यात आली आहे. आता याच कथेत महत्त्वाची भूमिका बजावणारा ‘मुसाफिर कॅफे’ प्रत्यक्षात आकार घेत असल्याने चाहत्यांसाठीही ही उत्सुकतेची बाब आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us