काळ ब्लॅक अँड व्हाईट होता पण दिवाळीचा उत्साह जोरदार होता, 68 वर्षांपूर्वीचं गाणं पाहिलंय का?
६८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं हे दिवाळी गीत आजही जुन्या आठवणींना उजाळा देतं. १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या गाण्यामध्ये काय होतं खास, चला तर मग आता दिवाळीनिमित्त जाणून घेऊयात...

दिवाळी आली रे आली. दारासमोर सुंदर रांगोळी, घराघरांमध्ये लागणाऱ्या पणत्यांचा लख्ख प्रकाश, लक्ष्मीपूजनाचा उत्साह आणि सगळीकडे पसरलेला आनंद… दिवाळी म्हणजे नुसती रोषणाई नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा मोठा उत्सव. आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत दिवाळीवर गाणी तर बरीच आली, पण काही जुनी गाणी अशी आहेत ज्यांची जादू आजच्या काळातही कायम आहे. अगदी 68 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं आणि गीता दत्त यांच्या गोड आवाजातलं एक गाणं तर आजही जुन्या आठवणी ताज्या करतं. चला तर मग, यंदाच्या दिवाळीच्या आनंदात भर घालणाऱ्या याच भन्नाट आणि क्लासिक गाण्याबद्दल आज थोडं जाणून घेऊयात.
1958 च्या गूंज उठी शहनाई सिनेमातील सुरेख गाणं
आई दिवाली आई हे गाणं 1958 मध्ये आलं होतं आणि तेव्हापासून ते लोकांच्या मनावर राज्य करतंय. दिग्दर्शक विजय भट्ट यांच्या गूंज उठी शहनाई या क्लासिक सिनेमात हे गाणं होतं. राजेंद्र कुमार आणि अमिता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या गाण्यातून त्याकाळच्या दिवाळीचं एकदम अस्सल आणि पारंपरिक रूप पाहायला मिळतं. गाण्यातल्या आंगन में तुलसी और जगमगाते दीप या ओळी ऐकल्या की आजही त्या साध्या आणि पवित्र वातावरणाची जादू अनुभवायला मिळते.
साधेपणाची जादू आणि वसंत देसाईंचं अप्रतिम संगीत
दरम्यान, आजकाल दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती बदलल्या असल्या, तरी या गाण्यातील गोडवा मनाला भुरळ घालतो. या सिनेमातील गाण्यांना वसंत देसाई यांनी संगीत दिलं होतं, तर भारत व्यास यांनी हे शब्द लिहिले होते. सिनेमातील जीवन में पिया तेरा साथ रहे आणि दिल का खिलौना हाय टूट गया यांसारखी गाणी तर गाजलीच, पण गीता दत्त यांनी गायलेलं आई दिवाली आई हे गाणं आपल्या सगळ्यांच्या दिवाळीच्या आठवणींमध्ये कायमचं अमर झालंय, असं म्हणता येईल. तुम्हीही यंदाच्या दिवाळीला जुन्या आठवणींना उजाळा देत हे गोड गाणं नक्की ऐका आणि सणाचा आनंद द्विगुणित करा.
