
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये गंभीर स्थिती आहे. भारतातील अनेक जणही या देशांमध्ये अडकले होते. शेकडो भारतीय नागरिक वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये अडकल्याने त्यांना व कुटुंबियांना मोठी चिंता होती. विख्यात मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभय हाही अडकलेल्या नागरिकांमध्ये होता. काही दिवसांपूर्वीच विशाखा सुभेदार यांनी सोळल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या मुलाला सुखरूप मायदेशी आणण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस तसेच पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती. त्यांनी रडत रडतच सरकारतकडे केलेली विनंती, तो व्हिडीो सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला. त्यांच्या या व्हिडीओची दखल घेत अभिनय सुभेदार यांना लवकरच मायदेशी आणू असं आश्वासन सरकारतर्फे देण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:, विशाखा सुभेदार यांना फोन केला, धीर दिला आणि मुलाला सुखरूप परत आणू असं आश्वासन दिलं.
अखेर आता अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा हा मायदेशी परतला आहे. त्यानंतर सुभेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मुलगा सुखरुप मुंबईत आल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
अभिनय सुभेदार हा कुवेतमार्गे लंडनला जात होता. कुवेत येथे त्याचा ट्रान्झिट थांबा होता. याच दरम्यान इराणने कुवेतवर ड्रोन व मिसाईल हल्ले सुरू केल्याने कुवेतचे हवाई क्षेत्र बंद ठेवण्यात आलं. विमान कंपन्यांनी अनिश्चित काळासाठी पुढील सर्व उड्डाणं रद्द झाली. त्यामुळे अभिनय व इतर काही नागरिक कुवेतमध्ये अडकून पडले. पुढे लंडनला जाणे किंवा मायदेशी परतणे यातील कोणतीच शक्यता नव्हती, त्यामुळे युद्धाचीही झळ सोसावी लागते की काय अशी भीती निर्माण झाली. कुवेतमध्ये ड्रोन इंटरसेप्शन दिसू लागल्याने जीवाचा प्रश्नही भेडसावू लागला होता.
युद्धसदृश स्थितीत मुलगा परदेशात अडकल्याने विशाखा सुभेदार चिंताग्रस्त होत्या, हावलदिल झाल्या. त्यानंतर त्यांनी मदतीची मागणी करणारा व्हिडीो पोस्ट केला जो सोशल मीडियावरून व्हायरल झाला. सुभेदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मदतीची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री कार्यालयाने वेगाने पावले उचलत विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदेश मंत्रालयाच्या सातत्याने संपर्कात होते. केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनाही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करण्यास सांगितले .
अचानक व्हिसाचा प्रश्न
कुवेतमध्ये अडकलेले अभिनय सुभेदार व अन्य महाराष्ट्रीयन नागरिकांना रियाध येथून भारतात परत आणण्याचे नियोजन करण्यात आलं. मात्र त्यांच्यापैकी अनेकांच्या व्हिसाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी अभिनय सुभेदार यांच्यासह काही जणांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.
त्यामुळे व्हिसा प्रक्रियेला गतीमान झाली आणि अभिनय यांच्यासह अन्य 30 महाराष्ट्रीयन नागरिकांचा कुवेतहून रियाधला (सौदी अरेबिया) जाण्याचा मार्ग मोकळा झाला. सुमारे 700 किलोमीटर अंतराचा प्रवास करून हे सर्व महाराष्ट्रातील नागरिक रस्ते मार्गाने रियाधला सुरक्षित पोहोचले. त्यानतंर रियाध येथून फ्लाईटद्वारे ते काल ( 9 मार्च) भारतातस मुंबईत परतले. मायदेशी आल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद तर होताच पण सुखरूप परतल्याने सर्वांनीच सुखाचा श्वास घेतला.
विशाखा, अभिनय सुभेदारांनी मानले सरकारचे आभार
मला मुंबईत परत यायला 11 दिवस लागले, प्रचंड आतुरता होती, अखेर आता मुंबईत आल्यावर खूप बरं वाटतंय. मी कुवेतमध्ये अडकलो होतो, तिथली परिस्थिती चिंतेची वाटली, तिथे मीसकाळ दुपार संध्याकाळ आकाशात मिसाईल फुटताना पाहिलेत . दूरवर मोठमोठे आवाजही ऐकलेत. मला कुवेतमधून सौदीला जायचे होते, पण व्हिसा मिळत नव्हता. पण मुख्यमंत्री फडणवीस यांचे खरच धन्यवाद, कारण त्यांच्याुळेच गल्फ हेड कडून माझ्यासोबत 24 जणांचा व्हिसा पास झाला असं म्हणत अभिनय सुभेदार यांनी सरकारचे आभार मानले.
माझा मुलगा एअरपोर्टला होता, तेव्हाच हल्ला झाला. तो अडकल्याचं कळल्यामुळे आम्ही हादरलो होतो, पण तेव्हा एकमेकांना समजावत,दिलासाही देत होत. मात्र एक वेळ अशी आली की आम्ही पॅनिक झालो. सरकारकडे मदतीची विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांनी खूप सहकार्य केलं, खूप प्रयत्न केले. कुवेतच्या महाराष्ट्र मंडळाने खूप चांगली काळजी घेतली , त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच माझा लेक परत आलाय इथे, असं सांगताना विशाखा सुभेदार भावूक झाल्या होत्या.