20 वर्षांपासूनची मैत्री, तरी नाना पाटेकरांसोबत केलं नव्हतं काम; दिग्दर्शकाने सांगितलं खरं कारण

विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'ओ रोमियो' या चित्रपटात नाना पाटेकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. जवळपास वीस वर्षांनंतर या दोघांनी एकत्र काम केलं आहे. इतक्या वर्षांपासूनची मैत्री असूनही नानांसोबत आतापर्यंत काम का केलं नव्हतं, याविषयी दिग्दर्शकांनी खुलासा केला.

20 वर्षांपासूनची मैत्री, तरी नाना पाटेकरांसोबत केलं नव्हतं काम; दिग्दर्शकाने सांगितलं खरं कारण
Nana Patekar and Vishal Bhadwaj
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 15, 2026 | 8:12 PM

शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा ‘ओ रोमियो’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कमाईसुद्धा ठीक-ठाक होत आहे. नुकतीच या चित्रपटाची संपूर्ण टीम ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या सेटवर पोहोचली. शनिवारी या कॉमेडी शोचा नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी आणि फरीदा जलाल हे सर्व सेलिब्रिटी आणि त्यांच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज तिथे उपस्थित होते. या संपूर्ण टीमने एकमेकांशी काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी सांगितलं. यादरम्यान कपिल शर्माने विशाल भारद्वाज यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला.

कपिल शर्माने नाना पाटेकर आणि विशाल भारद्वाज यांच्या मैत्रीचा उल्लेख केला. त्याने सांगितलं की हे दोघं एकमेकांना जवळपास 20 वर्षांपासून ओळखत आहेत. परंतु तरीही त्यांनी याआधी एकमेकांसोबत काम केलं नव्हतं. कपिलने विशाल भारद्वाज यांना विचारलं की त्यांनी आजपर्यंत इतक्या प्रतिभावान कलाकारासोबत काम का केलं नव्हतं? त्याचं उत्तर देताना भारद्वाज म्हणाले, “खरंतर ही माझीच चूक होती. मी याआधी कधीच नाना पाटेकर यांना अशी कोणती भूमिका दिली नव्हती. सर्वजण नाना पाटेकर यांना खूप घाबरतात. परंतु ते स्वभावाने खूप चांगले आहेत. मी त्यांना कधी काम दिलं नव्हतं म्हणून नाना माझ्यावर खूप नाराज होते. ते कुठेही मला भेटले की विचारायचे आणि आठवण करून द्यायचे की अरे, मी नाना पाटेकर आहे, अभिनेता आहे, मला कधी भूमिका देशील? मला तेव्हा खूप ओशाळल्यासारखं झालं होतं. अखेर आम्ही सोबत काम केलंच आणि त्यासाठी मला थोडा वेळ लागला.”

‘ओ रोमियो’ या चित्रपटात नाना पाटेकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. जवळपास दीड तास प्रतीक्षा केल्यानंतर नाना कार्यक्रमातून अचानक उठून गेले होते. शाहिद कपूर आणि तृप्तीसोबत इतर कलाकार कार्यक्रमाला वेळेत न पोहोचल्याने ते रागात निघून गेले होते.