आदित्य धरला बनायचं होतं क्रिकेटचा ‘धुरंधर’, BCCI च्या माजी अध्यक्षांच्या मुलामुळे मोडलं स्वप्न; नेमकं काय घडलं होतं?

'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटांमुळे दिग्दर्शक आदित्य धर सध्या यशाच्या शिखरावर आहे. परंतु एकेकाळी त्याचं क्रिकेटर बनण्याचं आणि टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न होतं. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, ते जाणून घ्या..

आदित्य धरला बनायचं होतं क्रिकेटचा धुरंधर, BCCI च्या माजी अध्यक्षांच्या मुलामुळे मोडलं स्वप्न; नेमकं काय घडलं होतं?
Aditya Dhar
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 25, 2026 | 9:56 AM

सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे ‘धुरंधर: द रिव्हेंज’. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक आदित्य धरच्या आयुष्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. फार क्वचित लोकांना माहीत असेल की दिग्दर्शक बनण्याआधी त्याचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न होतं. इतकंच नव्हे तर ‘अंडर 19’ टीममध्ये त्याची निवडसुद्धा होणार होती, परंतु बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांमुळे आदित्यच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं, असं समजतंय. आज आदित्य धर त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी, उत्तम दिग्दर्शनासाठी ओळखला जात असला, तरी या क्षेत्रात येण्याबद्दल त्याने आधीपासूनच विचार केला नव्हता. भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं.

अंडर 19 वर्ल्ड कपच्या टीममध्ये होऊ शकली नव्हती निवड?

आदित्य धरची दिल्ली युनिव्हर्सिटीकडून ऑलराऊंडर म्हणून इंटर-युनिव्हर्सिटी स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली होती. परंतु 2002 मध्ये त्याच्या हातून मोठी संधी हुकली. आदित्य स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर होता. टीम इंडियाच्या अंडर 19 टीमसाठी त्याने ट्रायलसुद्धा दिलं होतं. परंतु त्याची निवड होऊ शकली नव्हती. दिग्दर्शक प्रियदर्शनने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. “तो क्रिकेटर होता, परंतु काही राजकीय प्रभावामुळे त्याची अंडर 19 टीममध्ये निवड होऊ शकली नव्हती. यामुळे तो खूप निराश झाला होता”, असं तो म्हणाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य धरच्या जागी अंडर 19 च्या टीममध्ये स्टुअर्ट बिन्नीला टीममध्ये घेण्यात आलं होतं. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीची निवड झाली होती. भारताच्या अंडर 19 वर्ल्ड कप टीममध्ये निवड न होणं हा आदित्यसाठी फार मोठा झटका होता. भारतासाठी क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न तिथेच मोडलं होतं. परंतु हीच घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

स्टुअर्ट बिन्नीबद्दलची युजरची पोस्ट

एका युजरने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर यासंदर्भात लिहिलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. ‘आदित्य धर हा प्रोफेशनल क्रिकेटर होता आणि अंडर 19 वर्ल्ड कप 2002 साठी टीममध्ये निवड होण्यासाठी तो प्रयत्न करत होता. आदित्य धर उत्तम ऑलराऊंडर खेळाडू असूनही रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीला टीममध्ये निवडण्यात आलं. स्टुअर्ट बिन्नीने 2002 च्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या 6 सामन्यांमध्ये 34 धावा केल्या होत्या आणि 2 विकेट्स घेतले होते. राजकारणामुळे आदित्यने क्रिकेट सोडलं आणि फिल्ममेकिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आला’, असा दावा युजरने केला आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

क्रिकेट स्टॅटिशियनचं उत्तर

आदित्य धर वर्ल्डकपच्या टीममध्ये सहभागी होण्यास पात्र असल्याचा कोणताही लेखी पुरावा नसल्याचं, ‘विस्डेन’सोबत काम करणारे क्रिकेट स्टॅटिशियन अभिषेक मुखर्जी यांनी स्पष्ट केलं. ‘आदित्य धरला 2002 च्या अंडर 19 वर्ल्डकप टीममध्ये स्थान मिळालं नाही, अशा अफवा पसरत आहेत. तो कदाचित त्यावेळी उदयोन्मुख क्रिकेटपटू असेलही, पण तो वर्ल्डकपसाठीच्या टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी दावेदार होता, याचा मला कोणताही पुरावा दिसत नाही. आतापर्यंतच्या सर्व क्रिकेट रेकॉर्डमध्ये मला आदित्य धर हे नाव कुठेच आढळलं नाही. मी A Dhar असं मॅन्युअली तपासून पाहिलं’, असं त्यांनी लिहिलं आहे.

आदित्यने प्रियदर्शनचा ‘गर्दिश’ हा चित्रपट पाहिल्यानंतर फिल्ममेकिंगमध्ये करिअर करण्याचं ठरवलं होतं. 2006 मध्ये तो मुंबईत आला आणि प्रियदर्शनकडे त्याने इंटर्न म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने ‘काबुल एक्स्प्रेस’, ‘हाल-ए-दिल’ आणि ‘डॅडी कूल’ यांसारख्या चित्रपटांसाठी गाणीसुद्धा लिहिली होती. प्रियदर्शनच्या ‘आक्रोश’ आणि ‘तेज’ या चित्रपटांसाठी त्याने संवादही लिहिले आहेत. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटामुळे आदित्य प्रकाशझोतात आला. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. आता ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटांमुळे त्याची ख्याती जगभरात पसरली आहे.

Follow Us