
बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब अफवांना अजिबात सहन करत नाही. अनेकदा त्यांनी कायदेशीर कारवाईचंही पाऊल उचललंय. एकदा बच्चन कुटुंबाची सून, अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल असंच एक वृत्त चर्चेत आलं होतं. ऐश्वर्या आई होऊ शकत नसल्याचं हे वृत्त होतं. पोटातील टीबीमुळे ऐश्वर्या गरोदर राहू शकत नसल्याचं हे वृत्त होतं. या वृत्ताने संपूर्ण बच्चन कुटुंब संतापलं होतं. बिग बींनी त्यावर अत्यंत कठोर प्रतिक्रिया देत राग व्यक्त केला होता.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सून ऐश्वर्या रायच्या प्रेग्नंसीबद्दल पसरवलेल्या खोट्या वृत्ताची निंदा केली होती. ही घटना 2010 मधली आहे. ऐश्वर्याबद्दलचं हे वृत्त खोटं, मनाला वाटेल तसं लिहिलेलं आणि असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी केली होती. ‘आज मी अत्यंत वेदनेनं आणि द्वेषानं हा ब्लॉग लिहितोय. ते आर्टिकल पूर्णपणे खोटं आहे. पूर्णपणे निराधार, असंवेदनशील आणि पत्रकारितेची अत्यंत खालची पातळी आहे’, असं त्यांनी लिहिलं होतं.
या ब्लॉगमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, ‘मी माझ्या कुटुंबाचा प्रमुख आहे. ऐश्वर्या राय माझी सून नाही तर मुलगी आहे, एक महिला आहे, माझ्या कुटुंबाची एक सदस्य आहे. जर कोणी तिच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं, तर मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत तिच्यासाठी लढेन. जर तुम्हाला माझ्याबद्दल किंवा अभिषेकबद्दल काही म्हणायचं असेल, तर ते मी सहन करेन. परंतु माझ्या घरातील महिलांबद्दल कोणी चुकीची टिप्पणी करत असेल, तर ते मी सहन करणार नाही.’
मध्यंतरीच्या काळात अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाविषयी अनेक चर्चा होत्या. ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत माहेरी राहत असल्याचंही म्हटलं गेलं होतं. परंतु त्यावर बच्चन कुटुंबीयांनी कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु नंतर अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसले, तेव्हा या चर्चा आपोआप बंद झाल्या. नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिषेकने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार स्वीकारताना त्याने ऐश्वर्या रायचा विशेष उल्लेख करत तिचे आभार मानले होते.