Sharad Kapoor Wife : पहिल्या भेटीत मैत्री अन् 2 वर्षांनी थाटला संसार; शरद कपूरची पत्नी कोएल बसू आहे तरी कोण?
Sharad Kapoor Wife : प्रसिद्ध अभिनेता शरद कपूर त्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. तसंच त्याच्या पत्नीचीही चर्चा होतेय. कोण आहे अभिनेत्याची पत्नी? जाणून घ्या.

बॉलिवूड अभिनेता शरद कपूर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि ढासळत्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो अत्यंत अशक्त आणि दुर्बळ अवस्थेत दिसत आहे. एकेकाळी आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या शरदला या अवस्थेत पाहून चाहते थक्क झाले. या व्हिडिओमध्ये तो अभिनेता धड चालण्यासाठीसुद्धा धडपडत असल्याचे दिसत आहे. तेव्हापासून लोक त्याच्या आयुष्याबद्दल, कुटुंबाबद्दल आणि आर्थिक परिस्थितीबद्दल प्रश्न विचारत आहेत. दरम्यान, शरद कपूरची पत्नी कोएल बासू हिच्याबद्दलही चर्चा झाली आहे. कोण आहे अभिनेत्याची पत्नी? जाणून घेऊया.
शरद कपूरची पत्नी कोएल बासू कोण आहे?
शरद कपूरचा जन्म आणि संगोपन कोलकाता येथे झाले. अनेक वृत्तांनुसार, त्याची पत्नी कोएल बासू ही पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बासू यांची नात आहे. शरद आणि कोएल यांची पहिली भेट 2006 मध्ये कोलकाता येथील ‘द ओबेरॉय हॉटेल’मध्ये झाली होती, तिथं कोएल त्यावेळी काम करत होती. त्यांच्या पहिल्या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. शरद आणि कोएल यांचा डिसेंबर 2006 मध्ये साखरपुडा झाला. काही काळ डेटिंग केल्यानंतर, त्यांनी 2008 मध्ये लग्न केलं. शरद लग्नापूर्वी ज्योती बासू यांना भेटला होता आणि त्यांचे आशीर्वाद घेतले होते. पण, अभिनेत्याची पत्नी कोएल बसू फारशी प्रसिद्धीच्या झोतात राहत नाही.
शरद कपूरची सध्याची परिस्थिती समोर आल्यानंतर, त्याचे चाहते त्याच्या आरोग्याबद्दल तसेच त्याच्या आर्थिक अडचणींबद्दल चिंतित झाले. अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, अभिनेता अशक्त दिसत होता, त्याचे कपडे अस्वच्छ होते आणि त्याला चालताना त्रास होत होता. व्हिडिओमध्ये, शरदने स्पष्ट केलं की, घरातील परिस्थिती बिघडत चालल्यामुळे त्याला त्याच्या चार पाळीव कुत्र्यांना तात्पुरतं प्राणी निवारागृहात पाठवावं लागलं. शरद आणि त्याच्या पत्नीला चार कुत्र्यांची काळजी घेणं कठीण जात होतं. घरातील कामं आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त मदत उपलब्ध नव्हती. त्यामुळे, त्यानं आपल्या पाळीव कुत्र्यांना मुंबईस्थित स्वयंसेवी संस्था ‘योडा’च्या कल्याण केंद्रात पाठवण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओमध्ये, अभिनेत्यानं भावूक होऊन सांगितलं की, जेव्हा तो त्याच्या नवीन बंगल्यात राहायला जाईल, तेव्हा तो ‘योडा’ला त्याचे पाळीव कुत्रे परत करण्याची विनंती करेल, कारण तो त्यांच्याशिवाय जगू शकत नाही.
व्हिडिओमध्ये, शरदने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दलही सांगितलं. अभिनेत्याचा दावा आहे की, ज्या गोष्टींशी त्याचा काहीही संबंध नव्हता, त्यासाठी त्याला जबाबदार धरण्यात आलं. या घटनांचा त्याच्यावर खोलवर मानसिक परिणाम झाला, ज्यामुळे तो नैराश्यात गेला. शरदनं सांगितलं की, एक काळ असा होता जेव्हा तो दोन ते तीन वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. या काळात त्यानं स्वतःला लोकांपासून दूर ठेवलं. शरदनं व्हिडिओद्वारे चित्रपटसृष्टीतील सदस्यांना मदतीसाठी आवाहनही केलं. त्याने सांगितलं की, तो आर्थिक संकटातून जात आहे आणि त्याला कामाची गरज आहे. शरदचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक कलाकारांनी अभिनेत्याला मदत करण्याचं आवाहनही केलं.
