कोरोना काळात लग्न, प्रसंगी चालवला फूड स्टॉल; कोण आहे ‘संगीत देवबाभळी’ फेम शुभांगी सदावर्ते? घटस्फोटामुळे चर्चेत
'संगीत देवबाभळी' या नाट्यसंगीतातून रसिकांच्या मनावर विशेष छाप सोडणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर शुभांगी आणि तिचा पती आनंद ओक एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी लग्नाच्या 17 वर्षांनंतर घटस्फोट जाहीर केल्याच्या अवघ्या काही तासांतच संगीतकार आनंद ओक यांनी अभिनेत्री शुभांगी सदावर्तेपासून विभक्त झाल्याची माहिती दिली. शुभांगी ‘संगीत देवबाभळी’ या नाट्यसंगीतातून रसिकांच्या मनावर राज्य करतेय. आनंद आणि शुभांगीच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला. शुभांगीने ‘संगीत देवबाभळी’ या नाटकात संत तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत या नाटकात मानसी जोशीही मुख्य भूमिकेत आहे. बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीसुद्धा या नाट्यसंगीताचं तोंडभरून कौतुक केलं होतं. करिअरच्या शिखरावर असताना आता शुभांगीने पतीपासून विभक्त होत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
आनंद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोटाची माहिती दिली. काही वर्षांपूर्वीच आम्ही दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता, असं त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलंय. शूभांगी मुळची नाशिकची असून लहानपणापासूनच तिला गायनाची खूप आवड होती. तिने संगीत क्षेत्रातच करिअर करावं अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. शुभांगी कॉलेजमधील एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायची. एकांकिका करत असतानाच तिला व्यावसायिक नाटकासाठी विचारणा झाली. ‘संगीत देवबाभळी’ हे तिचं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. शुभांगीने मालिकांमध्येही काम केलंय. ‘नवे लक्ष्य’ ही तिची मालिका खूप गाजली होती.
View this post on Instagram
शुभांगी आणि आनंद यांनी कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात 2020 मध्ये लग्न केलं. त्यानंतरचा वर्षभराचा काळ त्यांच्यासाठी खूप अवघड होता. तेव्हा दोघांनी मिळून फूड स्टॉल सुरू केला होता. लॉकडाऊननंतर शुभांगीने पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक तिच्या करिअरला कलाटणी देणारं ठरलं. “सध्याच्या काळात, जिथे ग्लॅमरला अधिक महत्त्व दिलं जातं, तिथे संगीत देवबाभळीसारखं नाटक वास्तवाशी नातं टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरतं. प्राजक्त देशमुख यांचं उत्कृष्ट लेखन आणि संगीत हा या नाटकाचा आत्मा आहे. अशी नाटकं अजूनही अत्यंत आवडीने पाहिली जातात”, अशा शब्दांत परेश रावल यांनी कौतुक केलं होतं.
