
बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ अर्थात अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. निधनापूर्वी बरेच दिवस ते आजारी होते. रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आलं होतं. जुहू इथल्या राहत्या घरी त्यांनी आपले प्राण सोडले. धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर 1 जानेवारी 2026 रोजी त्यांचा शेवटचा ‘इक्कीस’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव चाहते आणि सिनइंडस्ट्रीतील कलाकारांसाठी भावूक करणारा होता. अनेकांनी ‘इक्कीस’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली होती. परंतु हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींनी हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. याविषयी खुद्द हेमा मालिनी यांनी सांगितलं आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी मोकळेपणे व्यक्त झाल्या. “याआधीही त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रत्येक वेळी ते हसत आणि निरोगी होऊन परतायचे. यावेळीही असंच काहीसं होईल अशी आम्हाला आशा होती,” असं म्हणताना त्या भावूक झाल्या होत्या. या मुलाखतीत त्यांना जेव्हा ‘इक्कीस’ हा चित्रपट पाहिला का असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या म्हणाल्या, “जेव्हा तो चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा मी मथुरेत होती. मला इथे माझं काम करायचं आहे. तसंच मी हा चित्रपट आता पाहू शकणार नाही. माझ्यासाठी हा फारच भावनिक अनुभव असेल. माझ्या मुलींचंही हेच मत आहे. कदाचित जेव्हा मी या वेदनेतून थोडीफार सावरेन, तेव्हा मी तो चित्रपट पाहू शकेन.”
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर जेव्हा सनी देओल-बॉबी देओल यांनी वेगळी शोकसभा आयोजित केली आणि हेमा मालिनी यांनी त्यांच्या मुलींसह वेगळ्या शोकसभेचं आयोजन केलं, तेव्हा पुन्हा एकदा देओल कुटुंबीयांसोबतच्या वादाच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु या चर्चांना हेमा मालिनी यांनी फेटाळलं आहे. “आमच्यातलं नातं कायम चांगलं आणि सलोख्याचं राहिलं आहे. आजही ते तसंच आहे. आमच्यात काहीतरी बिनसलंय असं लोकांना का वाटतं, हेच मला समजत नाही. कारण लोकांना गॉसिप हवं असतं. अशा लोकांना मी का उत्तर देऊ? मी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे का? मी का देऊ? हे माझं आयुष्य आहे. माझं खासगी आयुष्य आहे, हे आमचं खासगी आयुष्य आहे. आम्ही खूप आनंदी आहोत, एकमेकांच्या जवळ आहोत, इतकंच मी बोलेन. याशिवाय मला आणखी काही बोलायचं नाही”, असं उत्तर त्यांनी दिलं.