मी कोणाला दोष..; अखेरच्या काही दिवसांमध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत काय घडलं? हेमा मालिनी भावूक..
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिवंगत अभिनेते आणि पती धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनी भावूक झाल्या. रुग्णालयातून घरी आणल्यानंतर काय झालं, याविषयीही त्यांनी सांगितलं. सनी आणि बॉबी देओलसोबत कसं नातं आहे, याचीही खुलासा त्यांनी केला.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबावर आणि संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. देओल कुटुंबीय हळूहळू त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी, अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. “मी प्रचंड दु:खात होते, ते दु:ख अजूनही मनात कायम आहे. परंतु हळूहळू मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय, कारण हे सर्व माझ्या सहनशक्तीपलीकडचं आहे. मी स्ट्राँग आहे, असं प्रत्येकजण म्हणतं.. मी आहेच, पण कधीकधी तुम्ही..”, असं म्हणताना त्या भावूक झाल्या. आयुष्यात तुम्हाला पुढे जावंच लागतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या अखेरच्या दिवसांबद्दलही सांगितलं. “अखेरच्या काही दिवसांमध्ये ते घरीच होते. आधी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना घरी आणलं होतं. तोपर्यंत मला खात्री होती की ते ठीक होते. ते आणखी एक किंवा दोन वर्षांपर्यंत आमच्यासोबत राहतील असं मला वाटलं होतं. उपचारादरम्यान प्रत्येक गोष्ट.. म्हणजे, आपण कोणालाही दोष देऊ शकत नाही. मला माहीत नाही, ते ठीक होते. त्यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधीही त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रत्येक वेळी ते हसत आणि निरोगी होऊन परतायचे. यावेळीही असंच काहीसं होईल अशी आम्हाला आशा होती. ते सर्वोत्तम आयुष्य जगले. त्यांना जे काही हवं होतं, ते त्यांना मिळालं. इतके लोक त्यांच्यावर प्रेम करतात, याचा मला अभिमान वाटतो.”
View this post on Instagram
या मुलाखतीत हेमा मालिनी यांना सनी आणि बॉबी देओल या सावत्र मुलांसोबतच्या नात्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. “आमच्यातलं नातं कायम चांगलं आणि सलोख्याचं राहिलं आहे. आजही ते तसंच आहे. आमच्यात काहीतरी बिनसलंय असं लोकांना का वाटतं, हेच मला समजत नाही. कारण लोकांना गॉसिप हवं असतं. अशा लोकांना मी का उत्तर देऊ? मी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे का? मी का देऊ? हे माझं आयुष्य आहे. माझं खासगी आयुष्य आहे, हे आमचं खासगी आयुष्य आहे. आम्ही खूप आनंदी आहोत, एकमेकांच्या जवळ आहोत, इतकंच मी बोलेन. याशिवाय मला आणखी काही बोलायचं नाही”, असं उत्तर त्यांनी दिलं.
