सनी देओलच्या रागाबद्दल हेमा मालिनी स्पष्टच बोलल्या; “त्याला प्रचंड संताप..”
धर्मेंद्र आजारी असताना आणि त्यांच्या निधनानंतरही त्यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओलला अनेकदा पापाराझींवर भडकल्याचं पहायला मिळालं होतं. त्याच्या रागावर आता हेमा मालिनी यांनी मौन सोडलं आहे. त्या काय म्हणाल्या, जाणून घ्या..

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्याआधी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. रुग्णालयाबाहेर सतत पापाराझींचा गराडा असल्याने देओल कुटुंबीयांनी अखेर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. धर्मेंद्र यांना घरी आणल्यानंतरही घराबाहेरही पापाराझी गोळा होण्यास सुरुवात झाली होती. अशातच धर्मेंद्र यांचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते अत्यंत खंगलेल्या अवस्थेत दिसले होते. यावरून सनी देओलचा पारा चढला होता. या सर्व घडामोडींदरम्यान सनी देओलला अनेकदा पापाराझींवर भडकल्याचं पहायला मिळालं होतं. यावर आता त्याची सावत्र आई आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सांगितलं की धर्मेंद्र यांच्या आजारपणानंतर मीडियाच्या स्पॉटलाइटमुळे कुटुंबीय खूप त्रस्त झाले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना त्या म्हणाल्या, “सनी खूप नाराज होता आणि त्याला प्रचंड राग येत होता. कारण त्यावेळी आम्ही सर्वजण अत्यंत भावनिक टप्प्यातून जात होतो. त्या अवस्थेतही मीडिया आणि पापाराझी सतत आमचा आणि आमच्या गाड्यांचा पाठलाग करत होती. त्या काळात आम्हाला खूप छळलं गेलं होतं.”
View this post on Instagram
“धर्मेंद्रजींच्या जाण्याने सर्वजण दु:खात आहेत. कारण जवळपास महिनाभर आम्ही सर्वजण स्ट्रगल करत होतो. हॉस्पिटलमध्ये जे काही घडत होतं, त्या सर्व गोष्टींना आम्ही सामोरं जाण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही सर्वजण तिथे होतो, मी, ईशा, बॉबी सर्वजण उपस्थित होतो. त्याआधीही अनेकदा धर्मेंद्रजींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु दर वेळी ते ठीक होऊन घरी परत येत होते. यावेळीसुद्धा ते ठीक होतील, अशी आम्हाला आशा होती”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.
आजारपणाने आणि वृद्धापकाळाने खंगलेल्या धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पापाराझींनी पोस्ट केला होता. त्या व्हिडीओवरून सनी देओलने तीव्र संताप व्यक्त केला होता. जेव्हा सनीने त्याच्या घराबाहेर पापाराझींना पाहिलं होतं, तेव्हा तो त्यांच्यावर भडकला होता. तुम्हाला लाज नाही वाटत का, असा सवाल करत त्याने फोटोग्राफर्स आणि पापाराझींना फटकारलं होतं.
