प्राजक्ता माळीची ‘देवखेळ’ सीरिज ओटीटीवरून काढून टाकणार? नेमका आक्षेप कशाला? वाद काय?

प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या 'देवखेळ' या वेब सीरिजचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ही सीरिज आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा नेमका वाद काय आहे ते सविस्तर जाणून घ्या..

प्राजक्ता माळीची देवखेळ सीरिज ओटीटीवरून काढून टाकणार? नेमका आक्षेप कशाला? वाद काय?
देवखेळ वेब सीरिजवरून इतका वाद का? जाणून घ्या..
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 11, 2026 | 11:30 AM

कोकणातल्या ‘शंकासूर’ प्रथेवरून एका काल्पनिक कथा रचत ‘देवखेळ’ ही वेब सीरिज फेब्रुवारी 2026 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. मात्र या सीरिजवरून तेव्हा वाद निर्माण झाला होता. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजवर कोकणातल्या स्थानिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आता हा वाद विधानसभेतही पोहोचला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या सीरिजविरोधात कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर काढून टाकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र या वेब सीरिजमध्ये असं नेमकं आहे तरी काय आणि त्याला इतका विरोध का होत आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

‘देवखेळ’ला इतका विरोध का?

कोकणातील शंकासूर प्रथेचा धागा पकडून अंधश्रद्धेमुळे काय काय घडू शकतं, याची थरारक कथा ‘देवखेळ’ या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन-खेळे या पौराणिक आणि खूप जुन्या हिंदू लोककलेचं या सीरिजमध्ये विपरित चित्रण केल्याचं आणि लोककलेतील शंकासूर या दैवताचं अपमानकारक चित्रण केल्याचं कोकणातल्या नागरिकांचं म्हणणं आहे. यामुळेच या वेब सीरिजला कोकणातून तीव्र विरोध करण्यात आला. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नमन-खेळे ही अत्यंत लोकप्रिय आणि पौराणिक लोककला आहे. या लोककलेला सामाजिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामदैवतांशी या लोककलेचा थेट संदर्भ असल्याने त्याला धार्मिक दृष्टीने एक पावित्र्य आणि अधिष्ठान प्राप्त झालं आहे. ‘देवखेळ’ या वेब सीरिजमुळे या पौराणिक आणि खूप जुन्या लोकपरंपरेला धक्का लागत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

वेब सीरिजची कथा काय?

देवखेळ या वेब सीरिजमध्ये गुहागरमधील देवतळी नावाच्या एका काल्पनिक गावातली कथा दाखवण्यात आली आहे. या गावात विश्वास सरंजामे या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होते. कोकणात शिमग्याच्या उत्सवातच शंकासुराचे खेळ असतात. या खेळादरम्यान देवाची पालखी, मिरवणूक, घरोघरी येणारी पालखी.. असा सर्व सोहळा सुरू असतो. कोकणातील शिमगा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो की तिथे उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागतो. परंतु याच शिमग्यात दरवर्षी देवतळी गावात खून होतो.
गावात नव्याने नियुक्ती झालेल्या विश्वासकडे या प्रकरणाचा तपास सोपवला जातो. पंधरा वर्षांपासून देवतळी गावात शिमग्यात खूनाचं सत्र सुरू असतं. अखेर हे सत्र गावकऱ्यांसाठी श्रद्धेचा विषय ठरतो, कारण दरवर्षी शिमग्याला गावातील पापी माणसाची हत्या होते आणि शंकासूर त्याला शिक्षा देतो, असा समज गावकऱ्यांमध्ये निर्माण होतो. याचा तपास करण्यासाठी विश्वास कसा सापळा रचतो, या प्रकरणाच्या मुळाशी तो कसा पोहोचतो, या प्रश्नांची उत्तरं सीरिजमध्ये मिळतात.

Follow Us