
३० वर्षांपूर्वी राम गोपाल वर्माच्या दिग्दर्शनात आलेल्या एका सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला ए. आर. रहमानने संगीत दिले होते आणि त्यातील प्रत्येक गाणे सुपरडुपर हिट ठरले. आजही अनेक ठिकाणी ही गाणी ऐकायला मिळतात. या चित्रपटाच्या वेळचा एकचा एक किस्सा आहे. ‘रंगीला’ने केवळ राम गोपाल वर्माचे करिअरच घडवले नाही, तर उर्मिला मातोंडकरला रातोरात सुपरस्टार बनवले. याच चित्रपटाने कोरिओग्राफर अहमद खानलाही मोठा ब्रेक दिला. पण या सेटवर असे घडले की, सुपरहिट गाणे ‘हाय रामा ये क्या हुआ’च्या शूटिंगदरम्यान उर्मिला जखमी झाली.
अहमद खानने सांगितला किस्सा
अहमद खानने नुकताच ‘स्क्रीन स्पॉटलाइट’ला दिलेल्या मुलाखतीत ‘हाय रामा’ गाण्याचा हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “जग्गू दादा (जॅकी श्रॉफ) बाहेरून खूप रफ अँड टफ दिसतात, पण आतून ते अतिशय मऊ मनाचे आहेत. पण ‘हाय रामा’च्या शूटिंगदरम्यान त्यांनी उर्मिलाला एवढ्या जोरात मिठीत घेतले आणि फिरवले की, तिच्या दोन्ही हातांवर मोठाले निळे निशाण पडले.”
मेहबूब स्टुडीओमध्ये झाले होते शुटिंग
पुढे ते म्हणाले, “आम्ही मेहबूब स्टुडिओत शूटिंग करत होतो. सीनमध्ये उर्मिलाला पूर्ण फिरवायचे होते. जग्गू दादांनी खरंच तिला जोरात फिरवले. त्या क्षणी उर्मिलाच्या हाताला दुखापत झाली. ती वारंवार म्हणत होती, ‘जग्गू दादा, तुम्ही खूप जोरात पकडताय!’ पण नंतर तिला समजले की सीनची गरजच तशी आहे.”
अहमद पुढे म्हणाले, “जग्गू दादांनी मला सांगितले, ‘भीडू, तू टेन्शन घेऊ नको, मी सगळं सांभाळतो.’ मी तेव्हा फक्त 19 वर्षांचा होतो. जग्गू दादांना कसे सांगणार की ‘लेडीला पॅशनने पकडा’? त्यांच्या हातात पाण्याचा स्प्रे होता. ते स्वतःच्या हातावर, केसांत स्प्रे मारत होते की जेणेकरून ते जास्त अॅग्रेसिव दिसतील. पण खरे तर ते फक्त मला सांगायचे होते की, ‘घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे.’ ही गोष्ट मला आयुष्यभर प्रेरणा देत राहिली.”
शूट संपल्यावर उर्मिलाच्या हातावर दोन मोठाली निळी निशाणे स्पष्ट दिसत होती. अहमद म्हणतात, “मी सगळे पाहत होतो, पण काही करू शकलो नाही कारण रामू (राम गोपाल वर्मा) प्रत्येक टेकनंतर मुलासारखे टाळ्या वाजवत उत्साहात होते!” ‘रंगीला’ चित्रपटातील ‘हाय रामा’ गाणे आजही बॉलिवूडच्या सर्वाधिक सेक्सी आणि आयकॉनिक गाण्यांपैकी एक मानले जाते, पण त्यामागचा हा वेदनादायी किस्सा फार कमी लोकांना माहीत आहे.