Obesity Causes : मांसाहार केल्यामुळे वाढतो स्थूलतेचा धोका ? जाणून घ्या कारणे
जगात अनेक लोकांना नॉनव्हेज (मांसाहार) जेवण आवडतं. ते इतकं, की ते रोजच नॉनव्हेज खातात. कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तरच चांगली, अन्यथा त्यामुळे त्रासही होऊ शकतो.

जगात अनेकांना शाकाहारी ( Vegetarian) अन्न आवडतं तर काहींना मांसाहार (Non-vegetarian) करायला आवडतो. मात्र काहींना नॉन-व्हेज इतकं आवडतं की ते रोजच्या आहारातच त्याचा समावेश करतात. एखादी प्रमाणात खाल्यास चांगलं असतं, पण ती प्रमाणाबाहेर खाल्यास आरोग्याला त्यामुळे आरोग्याला त्रास होऊ शकतो. सध्याच्या काळात स्थुलता (Obesity) ही एक वाढती समस्या आहे. सर्व वयोगटातील लोकांना त्याचा सामना करावा लागत आहे. स्थुलतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्यानांही सामोरे जावे लागत आहे. स्थुलतेची कारणे अनेक असू शकतात. पण नॉनव्हेज खाल्यामुळेही स्थुलता वाढू शकते का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. काही लोकांना हे बरोबर वाटतं, तर काही म्हणतात नॉन-व्हेज आणि स्थुलतेचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या एका अभ्यासात या मुद्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
काय म्हटले आहे अभ्यासात?
पेटा ( PETA – People for the Ethical Treatment of Animal) या संस्थेच्या एका रिपोर्टनुसार, मांसाहारी अन्नात शाकाहारी अन्नापेक्षा अधिक फॅट्स असतात. वजन कमी करायचे असेल तर शाकाहारी अन्न खाल्ले पाहिजे. शाकाहार करणाऱ्यांच्या तुलनेत मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये स्थुलतेचा दर तिप्पट असतो, अशी माहिती अनेक रिपोर्ट्समधून समोर आली आहे. विशेष म्हणजे, जे लोक मांसाहार करतात किंवा नॉन-व्हेज खातात त्यांच्या तुलनेत शाकाहार करणाऱ्या लोकांचे वजन 4 ते 8 किलोपर्यंत कमी असते. या रिपोर्टनुसार, शाकाहारी अन्नामुळे केवळ वजन कमी करण्यास मदत होत नाही तर हृदयरोग, मधुमेह, कॅन्सरसारख्या अनेक आजारांविरोधात लढण्याचीही शक्ती मिळते.
स्थुलतेचे प्रमुख कारण नेमके काय ?
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲंड प्रिव्हेन्शनच्या (CDC) रिपोर्टनुसार, स्थुलता हा एक जटील, गुंतागुंतीचा आजार आहे. एखाद्या व्यक्तीच्या उंचीच्या तुलनेत जेवढे वजन अपेक्षित असते, त्यापेक्षा जास्त वजन असल्यास, त्या अवस्थेस स्थुलता म्हटले जाते. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत, सर्व वयोगटातील कोणालाही स्थुलतेचा त्रास सहन करावा लागू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयी, कमी शारीरिक हालचाल वा व्यायाम न करणे आणि अनियमित झोप यासह अनेक गोष्टी स्थुलतेसाठी कारणीभूत ठरू शकतात. काही वेळेस अनुवांशिकता किंवा काही औषधांच्या परिणामांमुळेही वजन वाढू शकते. वजन कमी करण्यासाठी किंवा ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. तसेच रोजच्या रोज थोडा वेळ का होईना व्यायाम करणे, चालणे तसेच पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींमुळे, चांगल्या जीवनशैलीमुळे तुमचे वजन तर आटोक्यात राहीलच पण तुम्ही निरोगी आयुष्यही जगू शकाल.
