Side Effects of Tea : जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक, होऊ शकतात ‘हे’ आजार
Side Effects of Tea चहा हे जगभरातील लोकांचे आवडते पेय आहे. अनेक लोक सकाळी उठल्यावर एक कप चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात. बऱ्याच जणांना वारंवार चहा पिण्याची सवय असते. मात्र चहाचे अति सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

चहा हे (Tea) जगभरातील कोट्ययावधी लोकांचे आवडते पेय आहे. काहींना दूध घालून केलेला चहा आवडतो तर काही जण ग्रीन टीला पसंती देतात. शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये (medicines) चहाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. अनेक लोक सकाळी उठल्यावर एक कप चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात. चहा पिण्याचे अनेक फायदे असतात. बऱ्याच अभ्यासांमधून हा निष्कर्ष समोर आला आहे की, चहा प्यायल्यामुळे कर्करोग, जाडेपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. एक मर्यादेत चहा प्यायल्यास त्याचा फायदा होतो. मात्र बऱ्याच जणांना वारंवार चहा पिण्याची सवय (drinking too much tea) असते. मात्र चहाचे अति सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही दिवसभरात 3 किंवा 4 कपापेक्षा जास्त चहा पित असाल तर ते तुमच्या तब्येतीसाठी धोकादायक (side effects of tea) ठरू शकते. जास्त चहा प्यायल्यामुळे काय त्रास होऊ शकतो, ते जाणून घेऊयात.
चहाच्या अतिसेवनामुळे होणारे दुष्परिणाम
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, दिवसभरात सतत चहा पीत राहिल्यास शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते. चहाच्या पावडरीमध्ये टॅनिन (Tannins) नावाचा पदार्थ असतो, तो शरीरात असणाऱ्या लोहाच्या घटकांशी चिकटतो आणि पचन क्रियेपासून दूर करतो. शरीरात लोहाची कमतरता असेल तर ॲनिमिया होऊ शकतो. त्यामुळे चहाचे अति सेवन करू नये. तसेच ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या लोकांनी चहापासून दूर रहावे.
अस्वस्त वाटणे, थकवा येणे
जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास अस्वस्थ वाटते तसेच थकवाही येऊ शकतो. चहामध्ये कॅफीनचे प्रमाण खूप जास्त असते. कॅफेनमुळे शरीरातील अस्वस्थता आणि थकवा वाढतो. तसेच दिवसभरात अति चहा प्यायल्यामुळे तुमच्या झोपेवरही परिणाम होतो. कॅफेनमुळे झोप न येण्याचा त्रासही होतो. पुरेशी झोप न झाल्यास तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. तणाव आणि चिंता वाढू शकते. त्यामुळे दिवसभरात 3 पेक्षा अधिक कप चहा पिणे टाळावे.
पोटाच्या समस्या
चहाचे अति सेवन केल्यास त्या व्यक्तीला पोटाच्या समस्याही सहन कराव्या लागू शकतात. अति चहामुळे ॲसिडिटी तसेच गॅसेसचा त्रास होऊ शकतो. गर्भवती महिलांनी तर चहापासून लांबच रहावे. गर्भारपणात अति चहा पिणे नुकसानकारक ठरू शकते. चहाच्या अति सेवनामुळे आई व गर्भातील बाळ , या दोघांनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळेच गर्भवती स्त्रियांनी जास्त चहा पिऊ नये, त्याऐवजी पौष्टिक आहार, दूध यांचे सेवन करावे, असा सल्ला डॉक्टर देतात.
