घरी वर्कआउट करताय? व्यायाम करताना या चुका टाळा, अन्यथा फिटनेसऐवजी होऊ शकते गंभीर दुखापत
Fitness Tips: घरी व्यायाम करताना अनेक जण काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. घरी वर्कआउट करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि व्यायाम अधिक सुरक्षित कसा करावा, हे जाणून घेऊया.

अनेक लोक वेळेची बचत करण्यासाठी किंवा जिममध्ये जाणे शक्य नसल्यामुळे घरीच व्यायाम करण्याला प्राधान्य देतात. यासाठी काही जण ऑनलाइन व्हिडीओ पाहून वेगवेगळे व्यायाम प्रकारही करून पाहतात. मात्र, व्यायामाची योग्य पद्धत माहीत नसल्यास किंवा आवश्यक काळजी न घेतल्यास दुखापत होण्याची शक्यता असते. चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने स्नायूंवर ताण येऊ शकतो आणि शरीरात वेदनाही जाणवू शकतात. त्यामुळे घरी व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
वॉर्मअप शिवाय व्यायाम नको
वॉर्मअप न करता व्यायामाला सुरुवात केल्यास स्नायूंवर ताण येऊ शकतो. विशेषतः सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्नायू आखडलेले असतात. अशा वेळी थेट व्यायाम केल्यास दुखापत होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही मिनिटे वॉर्मअप नक्की करा.
सुरुवात सोप्या व्यायामाने करा
तुम्ही पहिल्यांदाच व्यायाम करत असाल तर सुरुवातीला कठीण व्यायाम करण्याचे टाळा. आधी सोपे व्यायाम करा आणि हळूहळू त्यांची तीव्रता वाढवा. यामुळे शरीराला व्यायामाची सवय होण्यास मदत होते.
सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका
घरी व्यायाम करताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यायामासाठी योगा मॅट किंवा आवश्यकतेनुसार क्रॅश मॅटचा वापर करा. तसेच तुम्ही ज्या प्रकारचा व्यायाम करत आहात, त्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा साधने जवळ ठेवा. यामुळे घसरून पडणे किंवा दुखापत होण्याचा धोका कमी होतो.
एकाच प्रकारचा व्यायाम वारंवार करू नका
दररोज एकाच प्रकारचा व्यायाम केल्याने शरीरातील सर्व स्नायूंना समान व्यायाम मिळत नाही. त्यामुळे फिटनेसचा समतोल राखण्यासाठी वेगवेगळ्या स्नायूंवर फोकस करणाऱ्या व्यायामांचा समावेश करा.
शरीराला विश्रांती द्या
व्यायाम इतकीच शरीराला विश्रांती देणेही महत्त्वाचे आहे. सतत व्यायाम केल्याने स्नायूंवर ताण येतो आणि दुखापत होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे व्यायामादरम्यान योग्य अंतर ठेवा आणि स्नायूंना रिकव्हर होण्यासाठी पुरेसा वेळ द्या.
एकाच वेळी जास्त व्यायाम करू नका
नवीन व्यायाम सुरू करताना सुरुवातीलाच शरीरावर जास्त ताण देऊ नका. आपल्या क्षमतेनुसार कमी वेळ आणि कमी तीव्रतेचे व्यायाम करा. हळूहळू सराव वाढवल्यास शरीराला त्याची सवय होईल आणि दुखापतीचा धोकाही कमी होईल.
