
मुंबई : सध्याच्या काळात बहुतेक लोकांना जंक फूड खाण्याची सवय मोठ्या प्रमाणात असते. कुठेही बाहेर फिरायला गेल्यानंतर, कामाला जाताना, शाळेत किंवा कॉलेजला जाताना, किंवा मित्र मैत्रिणींसोबत गप्पा मारताना लोक आवर्जून फास्ट फुडचा आस्वाद घेतातच. तसेच भरपूर लोकांना चमचमीत असे बाहेरचे पदार्थ खायची सवय असते, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात अशा पदार्थांचा आस्वाद घेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की हेच पदार्थ तुमच्यासाठी घातक ठरू शकतात. आजकाल बहुतेक लोकांना अशक्तपणा, थकवा अशा समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात दिसतात. तर आज आपण काही अशा पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते आणि तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो.
1. तळलेले पदार्थ- बहुतेक लोकांना तळलेले पदार्थ खायला खूप आवडतं. त्यात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम, कुरकुरीत असे तळलेले पदार्थ खायला आवडतात. पण हेच तळलेले पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा देखील येऊ शकतो. त्यामुळे तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका. नाहीतर तुम्हाला अशक्तपणा येणे किंवा ऍसिडिटी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
2. साखर – आजकाल लोकांना गोड पदार्थ खायला भरपूर आवडते. पण साखरेचे जास्त सेवन देखील शरीराला घातक ठरू शकते. साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी कमकुवत होतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अशक्तपणा येतो. त्यामुळे लोकांनी साखरेचे सेवन जास्त प्रमाणात करू नये.
3. प्रक्रिया केलेले पदार्थ- तुम्ही जर प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल तर ते तुमच्या शरीराला घातक ठरू शकते. कारण असे पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते तसेच त्यामध्ये अस्वास्थ्यकर चरबीही असते. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला हानी निर्माण होऊ शकते आणि अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे असे प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.