बीटच्या सालींचे इतके फायदे तुम्हाला माहित नसतील, सौंदर्यापासून ते बागकामापर्यंत असा करा उपयोग

बीटापासून अनेक हेल्दी पदार्थ बनवून आपण आपल्या आहारात समावेश करत असतो. अशातच अनेकदा बीट सोलून त्याची साले निरुपयोगी म्हणून टाकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यापासून ते बागकामांपर्यंत बीटांच्या सालीचा वापर केला जाऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण बीटाच्या सालीचा वापर कश्या प्रकारे करू शकतो ते जाणून घेऊयात.

बीटच्या सालींचे इतके फायदे तुम्हाला माहित नसतील, सौंदर्यापासून ते बागकामापर्यंत असा करा उपयोग
| Edited By: | Updated on: Nov 11, 2025 | 4:44 PM

हिवाळ्यात बीट हे एक सुपरफूड मानले जाते. आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण बीट पासून ज्यूस, सॅलड आणि इतर अनेक पदार्थ बनवून त्यांचा डाएटमध्ये समावेश करत असतो. कारण बीटामध्ये भरपूर पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते त्याचबरोबर यात फायबर आणि लोहाचा देखील एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. शिवाय दररोज बीटाचे सेवन केल्याने शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. बहुतेक लोकं बीटाची सालं सोलून त्याचे सेवन करतात . पण तुम्हाला माहित आहे का की बीटाचे हे साल अनेक प्रकारे उपयुक्त देखील असू शकते?

बीटाप्रमाणेच त्याची साल देखील फायदेशीर आहे. बीटच्या साली आपल्या घरातील बागकामांपासून ते त्वचेपर्यंत आणि केसांपर्यंत सर्व गोष्टींसाठी फायदेशीर आहेत. त्यांचा वापर चेहरा किंवा केसांसाठी पॅक बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात बीटाच्या सालींचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो.

बीट फेस पॅक

तुम्ही बीटच्या सालीचा फेस पॅक बनवू शकता. प्रथम बीटाची साल स्वच्छ करा आणि ती नीट बारीक पेस्ट करा. आता त्यात थोडे गुलाबपाणी आणि बेसन मिक्स करून एक मऊ पेस्ट तयार करा आणि ती तुमच्या चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावा, नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक तुमचा रंग उजळवण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करू शकतो.

लिप टिंट बनवा

हिवाळ्यात ओठ फाटणे ही एक सामान्य समस्या आहे. तुम्ही बीटांच्या सालीपासून घरी लिप टिंट बनवू शकता. लिप टिंट बनवण्यासाठी, बीटांची साले वाळवा. त्यानंतर सुकलेली सालांना बारीक करून त्यांचा रस काढा आणि त्यात थोडेसे खोबरेल तेल मिक्स करून पेस्ट बनवा आणि ते तुमच्या ओठांना लावा. यामुळे हिवाळयात ओठांना ओलावा आणि नैसर्गिकरित्या गुलाबी राहण्यास मदत होईल.

बागकामासाठी वापरा

बीटाच्या सालांचा वापर तुम्ही घरातील बागकामासाठी देखील करू शकता. तुम्ही त्यापासून कंपोस्ट बनवू शकता. बीटच्या साली या सेंद्रिय कचरा आहेत. तुम्ही त्यांना इतर भाज्यांच्या सालींसोबत मिक्स करू शकता आणि कंपोस्ट पिटमध्ये घालू शकता. यामुळे सेंद्रिय खत तयार होते. याचा वापर तुम्ही बागकामांसाठी करू शकता.

हेअर पॅक

बीटची साले स्वच्छ पाण्याने धुऊन त्याची पेस्ट बनवून त्यांचा हेअर पॅक बनवा व केसांना लावा. याशिवाय बीटची साले पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर त्या पाण्याने केस धुवा. यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते आणि केसांसाठी नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करते.

हे लक्षात ठेवा

बीटच्या साली वापरण्यापूर्वी त्यावरील घाण किंवा रसायने काढून टाकण्यासाठी त्यांना चांगले धुवा. जर तुम्हाला ॲलर्जी किंवा त्वचेवर पुरळ येत असेल, तर ते लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. त्यानंतरच त्याचा वापर करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)