
आजच्या काळात 100 वर्षांपेक्षा जास्त जगणं, तेही पूर्णपणे निरोगी आणि सक्रिय राहून, हे अनेकांना अशक्य वाटतं. पण एका 101 वर्षांच्या डॉक्टरने हे शक्य असल्याचं सिद्ध केलं आहे. या डॉक्टरने आपल्या आयुष्यात काही साध्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारल्या, ज्या त्यांनी दीर्घायुष्याचे रहस्य म्हणून जगासोबत शेअर केल्या आहेत. हे नियम कोणत्याही महागड्या औषधोपचारांवर किंवा विशिष्ट जनुकीय रचनेवर (genetics) आधारित नाहीत, तर रोजच्या जीवनातील निवडक सवयींवर अवलंबून आहेत.
101 वर्षांच्या डॉक्टरचे 7 लाइफस्टाइल सीक्रेट्स
या डॉक्टरने अनेक दशकांपासून या सवयी पाळल्या आहेत आणि आता ते त्या जगाला सांगत आहेत:
तंबाखूला ‘ना’ म्हणा : या डॉक्टरने नेहमीच धूम्रपानापासून स्वतःला दूर ठेवले. धूम्रपान हे अकाली मृत्यूचे एक मोठे कारण आहे, असे ते ठामपणे मानतात.
दारूचे सेवन टाळा : त्यांनी कधीही दारूचे सेवन केले नाही. त्यांच्या मते, दारूमुळे कर्करोग आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो, ज्यामुळे आयुष्य कमी होतं.
जिमऐवजी मैदानी व्यायाम : त्यांच्या फिटनेसचे रहस्य गार्डनिंग आणि घराबाहेर केलेली कामे आहे. जिममध्ये जाऊन कठोर व्यायाम करण्याऐवजी, ते नैसर्गिकरित्या सक्रिय राहण्यावर भर देतात. ते सांगतात की, विशेषतः ४० ते ७० या वयामध्ये सक्रिय राहणे खूप महत्त्वाचे आहे, कारण याच काळात आरोग्याच्या समस्या सुरू होतात.
इंटरमिटेंट फास्टिंग : निरोगी वजन आणि चयापचय (metabolism) क्रिया उत्तम ठेवण्यासाठी ते फक्त नाश्ता आणि दुपारचं जेवण करतात, रात्रीचं जेवण टाळतात. यामुळे शरीराला आराम मिळतो आणि पचनशक्ती सुधारते.
आयुष्यभर शाकाहार : गेल्या 20 वर्षांपासून ते शाकाहारी (plant-based diet) आहेत. त्यांच्या आहारात दूध आणि अंडी यांचा समावेश आहे, पण कोणत्याही प्रकारचे मांस नाही. शाकाहारामुळे अनेक गंभीर आजार टाळता येतात, असा त्यांचा विश्वास आहे.
गोड पदार्थ कमी करा : ते अतिरिक्त साखरेऐवजी फळे आणि इतर नैसर्गिक गोड पदार्थांना प्राधान्य देतात. यामुळे लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
सॅचुरेटेड फॅट टाळा : त्यांच्या आहारात सॅचुरेटेड फॅट कमी असते, ज्यामुळे हृदयरोगाला प्रतिबंध होतो आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात.
या डॉक्टरची गोष्ट आपल्याला हे शिकवते की, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी कोणत्याही विशिष्ट डाएट किंवा महागड्या उपचारांची गरज नाही. साधेपणा, सातत्य आणि शिस्त या तीन गोष्टींवर त्यांनी जोर दिला. त्यांचे हे नियम आपल्या जीवनशैलीत छोटे पण महत्त्वाचे बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा देतात. या सवयींमुळे तुमचे आयुष्य नक्कीच अधिक निरोगी होऊ शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)