World Sight day 2022: देशात 1.9 कोटी मुलांना डोळ्यांचा आजार, असा करा बचाव

| Updated on: Oct 13, 2022 | 4:13 PM

डोळ्यांची निगा राखायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे, असे डॉक्टर सांगतात.

World Sight day 2022: देशात 1.9 कोटी मुलांना डोळ्यांचा आजार, असा करा बचाव
Follow us on

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याचा दुसरा गुरुवार हा वर्ल्ड साइट डे (world sight day) म्हणून साजरा केला जातो. डोळ्यांच्या कमकुवतपणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. मोतीबिंदू हे भारतातील अंधत्वाचे सर्वात मोठे कारण आहे . याशिवाय लहानपणापासूनच अंधत्व (blindness) हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. डोळ्यांच्या समस्यांबाबत लोकांना वेळीच जागरूक करणे हाच डोळ्यांचे आजार (eye diseases) रोखण्याचा एकमेव मार्ग असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत डोळ्यांच्या आजाराची लक्षणे आणि त्यापासून बचाव कसा करावा, याबाबत प्रत्येकाने जागरूक असणे गरजेचे आहे.

उपचार तंत्रात झालेल्या क्रांतिकारी बदलांमुळे ग्लूकोमा (काचबिंदू), मोतीबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी यांसारख्या अंधत्वाच्या कारणांपासून डोळ्यांना सहज वाचवता येते, असे सेंटर फॉर साइटचे संचालक डॉ. महिपाल एस. सचदेव यांनी नमूद केले. मात्र यासाठी वेळीच या आजाराचा शोध घेणे आवश्यक आहे. कारण ग्लूकोमा व डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे होणारे अंधत्व टाळणे शक्य असते. मात्र व्यक्ती एकदा अंध झाली तर उपचार शक्य होत नाहीत.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, वर्ल्ड साइट डे चा उद्देश हा, डोळ्यांच्या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अंदाजानुसार , सुमारे 1.5 कोटी लोक हे रिफ्रेक्टिव्ह एरर मुळे दृष्टीदोषाने ग्रस्त आहेत. रिफ्रेक्टिव्ह एरर म्हणजे मायोपिया हायपरोपिआ आणि सिलिंड्रिकल समस्या. सुमारे 1.9 कोटी मुलं ही डोळ्यांच्या आजाराने त्रस्त आहेत, तर 14 लाख मुलांच्या अंध्यत्वावर इलाज नाही.

हे सुद्धा वाचा

अशा पद्धतीने घ्या डोळ्यांची काळजी –
डोळ्यांची निगा राखायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे, असे डॉक्टर सचदेव यांनी स्पष्ट केले. आहारात ओमेगा-3 फॅटी ॲसिड, झिंक आणि व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यास मोतियाबिंदूसारख्या समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो. त्याशिवाय जास्त वेळ उन्हात जाऊ नये. जास्त वेळ उन्हात राहिल्याने आणि हानिकारक अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे तुम्हाला मोतियाबिंदू होण्याचा धोका वाढतो.

सतत कॉम्प्युटर वापरत असाल तर घ्या ब्रेक –
सतत कॉम्प्युटर स्क्रीन पाहणे चांगले नाही. मधेमध्ये ब्रेक घेतला पाहिजे. ब्रेक न घेता बराच वेळ कॉम्प्युटर स्क्रीनवर काम करत राहिल्यास दृष्टी अंधुक होणे, डोकेदुखी अशा समस्या उद्भवू शकतात. आपला संगणक अशा प्रकारे ठेवा की मॉनिटर आपल्या डोळ्यांना समांतर राहिल. शक्य असेल तर डोळ्यांना आराम देण्यासाठी दर 20 मिनिटांनी सुमारे 20 सेकंदांसाठी 20 फूट अंतरावर असलेल्या गोष्टी पहाव्यात. तसेच दर 2 तासांनी खुर्चीवरून उठून 15 मिनिटांचा ब्रेक घ्या. असे केल्याने डोळ्यांच्या अनेक समस्या सहज टाळता येऊ शकतात.

जर डोळ्यांतून पाणी येत असेल किंवा डोळे कोरडे पडण्याचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच उपचार घेतल्यास डोळ्यांचे बहुतांश आजार सहज टाळता येऊ शकतात.