Prashant Jagtap: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवारांचा मोठा निर्णय काय? प्रशांत जगतापांनी दिली अपडेट
Sharad Pawar-Ajit Pawar NCP: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावी अशी भूमिका समोर येताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला. नाराज असलेले जगताप आता शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. काय घडामोड घडतेय?

Prashant Jagtap NCP: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर सर्वच राजकीय पक्षांची राजकीय खिचडी दिसली. राजकीय समीकरण जुळवून आणण्यासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची मनं जुळल्याचे दिसून आले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील अनेकांनी या निवडणुकीत दिलजमाईची भूमिका मांडली. पण या शक्यतेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुण्यात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कडाडून विरोध केला. त्यांनी थेट राजीनामा देण्याची भूमिका मांडली. त्यानंतर आज ते शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर या बैठकीनंतर प्रशांत जगताप हे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी याविषयीची महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येतील की नाही? हा संभ्रम दूर झाला आहे.
प्रशांत जगताप यांची भूमिका काय?
गेल्या साडेचार वर्षांपासून एकत्र राष्ट्रवादी, नंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पक्षात काम करण्याची संधी मिळाली. माजी महापौर या नात्यानं मला शहरातील प्रश्न माहिती होते. कार्यकर्त्यांचं संघटनं मी केलं. शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. तर काहींनी अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा सूर आवळला. महाविकास आघाडी तोडण्याचे काहींनी सूतोवाच केला. यामुळे महाविकास आघाडीत मीठाचा खडा पडण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
तर महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्यास काय चित्र असेल. दोन्ही राष्ट्रवादी म्हणून एकत्र निवडणूक लढल्यास काय चित्र असेल याचा लेखाजोखा घेऊन आपण शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली. शरद पवार यांनी भेटीला बोलवले आहे. त्यांच्यासमोर हा अहवाल सादर करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. याविषयीचा काही निर्णय घेण्याचा अधिकार शरद पवार यांचा आहे. त्यात मी ढवळाढवळ करणार नाही. पण कार्यकर्त्यांच्या आयुष्याचं मातेरं होऊ नये अशी माझी प्रामाणिक भूमिका असल्याची प्रतिक्रिया जगतापांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नाहीच
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा दबदबा होता. अशा ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा सूर दोन्ही बाजूच्या काही नेत्यांनी, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना आळवला आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत लढल्यास काय होईल याविषयीचा लेखाजोखा आपण शरद पवार यांच्याकडे सादर करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. त्यानंतर याविषयीचा निर्णय शरद पवार घेतील असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? याविषयीची चर्चा रंगली होती. मात्र दोन्ही राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढणार नाहीत, असा निर्णय शरद पवार यांनी घेतल्याची माहिती जगतपा यांनी दिली. तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाही हा निर्णय पवारांनी फोनवरून सांगितल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
